ऑनर किलिंगने पुन्हा हादरले नगर

ऑनर किलिंगने पुन्हा हादरले नगर

ऑनर किलिंग - प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ऑनर किलिंगची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे. जामखेडची घटना ताजी असताना ही घटना घडली आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीची जन्मदात्या माता-पित्यानेच हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना नेवासा तालुक्यात घडली असून, याबाबत सोनई पोलीस ठाण्यात मयत मुलीच्या आई-वडिलांविरोधात खून करून पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिभा देवेंद्र कोठावले (वय २४) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड, आई आशा ब्रह्मदेव मरकड (दोघे रा. कौठा, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी मयत प्रतिभाचे पती देवेंद्र प्रकाश कोठावले (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. मयत प्रतिभा व देवेंद्र कोठवले यांचा आंतरजातीय विवाह झाला होता. विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. २३ एप्रिलला प्रतिभा नेवासा तालुक्यातील कौठा येथे माहेरी गेली होती. बुधवारी (२४ एप्रिल) रात्री नऊ ते गुरूवारी (२५ एप्रिल) दीडला दरम्यान तिच्या आई- वडिलांनी आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून प्रतिभाचा निर्घूण खून केला. घरासमोरच घाईत अंत्यविधी केला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. मृत्यूनंतर तातडीने अंत्यविधी झाल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी होऊ शकली नाही. यावरून पोलिसांनी मयताचे आई-वडिलांविरुद्ध पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: April 27, 2019 8:56 PM
Exit mobile version