जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो नागरिकांची झुंबड

जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो नागरिकांची झुंबड

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातुन राज्यांतर्गत तसेच आंतरराज्य प्रवासासाठी पासेसचे वितरण केले जात असल्याच्या अफवेने आज सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची एकच झुंबड उडाली. हजारोच्या संख्येने नागरिक पासेस घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. अखेर पोलीस कुमक मागविण्यात येउन नागरिकांची समजूत घालून त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले. करोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीयाव्दारे अशा प्रकारे अफवांचे पेव फुटल्याने पोलीसांसमोर एक नव्हे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे ही अफवा कोणी पसरवली याचा पोलीस शोध घेत आहेत.

देशभरात लॉकडाउनची मुदत ३ मे वरून १७ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळया ठिकाणी अडकलेल्या नागरिकांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र राज्य सरकारने या नागरिकांना आपआपल्या घरी परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. यासाठी शासनाने जारी केलेल्या निर्देशानूसार विद्यार्थी, कामगार आणि मजूरांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करण्यास सांगितले आहे. त्यातच शुक्रवारी नाशिकमध्ये राज्यात प्रथमच पहीली रेल्वे भोपाळच्या दिशेने सोडण्यात आली. तर शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशकडे एक रेल्वे रवाना झाल्याने परराज्यातून नाशिकमध्ये आलेल्या आणि लॉकडाउनमुळे नाशिकमध्ये अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शासन निर्देशानूसार राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच नागरिकांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तालुक्यातील तहसिलदारांवर जबाबदारी सोपवली आहे. यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली त्यांची इन्सिडेंट कमाडंर म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान शुक्रवारी विविध जिल्हयातून जिल्हा प्रशासनाने प्रवासासाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध करून दिल्याचे मेसेज सोशल मिडीयावरून व्हायरल झाले. त्यातच नाशिकमधून दोन स्पेशन ट्रेन सोडण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवासासाठी पासेस वितरित केले जात असल्याची अफवा पसरली आणि पासेस घेण्यासाठी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोबा गर्दी झाली. सुमारे हजार ते दोन हजार नागरिकांचा जमाव परिसरात जमला. या नागरीकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात जात पासेस देण्याची मागणी केली. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याने तातडीने पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी नागरिकांची समजूत घालण्यात येउन त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले. मात्र करोनाचा संसर्ग रोखण्यासह अफवांनाही मोठया प्रमाणावर पेव फुटू लागल्याने प्रशासनासमोर या अफवा थोपवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्हयाच्या बाहेर जाण्यासाठी पासेस मिळावेत याकरीता नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. याबाबत माहीती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारीव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना पासेससाठी ऑनलाईन प्रक्रिया करावी असे सांगण्यात आले. त्यानंतर नागरिकांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले.

अमोल तांबे, उपायुक्त, नाशिक परिमंडळ

दोन दिवसांत २८०० अर्ज

नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रवासासाठी परवानगी देण्यासाठी संकेतस्थळावर सोय उपलब्ध करून दिली असून आतापर्यंत नाशिक ग्रामीण भागातून २८५३ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले असून यापैकी दोन दिवसांत ९६ अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर २७२१ अर्ज नामंजूर करण्यात आले आहे.

First Published on: May 2, 2020 2:56 PM
Exit mobile version