अमानुषता : नाशिक सिव्हिलमध्ये गर्भवतीला धक्काबुक्की, अर्भकाचा मृत्यू

अमानुषता : नाशिक सिव्हिलमध्ये गर्भवतीला धक्काबुक्की, अर्भकाचा मृत्यू

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेला सिव्हिलमध्ये कार्यरत स्वच्छता कर्मचारी महिलेने धक्काबुक्की केल्याने अर्भकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आलीय. संबंधित महिलेवर कठोर कारवाईची मागणी पिडितेच्या कुटुंबाने केलीय. सरकारवाडा पोलिसांकडेही यासंदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान,  अमानूष प्रकाराला जबाबदार महिलेवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी श्रमजिवी संघटनेने केलीय.

मंगळवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास पेठ तालुक्यातील रहिवाशी हिरा गारे ही महिला प्रसूतीसाठी नाशिकच्या सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. सकाळी ती स्वच्छतागृहाकडे जात असताना करुणा चौधरी या स्वच्छता कर्मचारी महिलेने हिराला धक्का देत बाजूला केलं. तसेच, शिवीगाळही केली. या धक्क्यामुळे हिरा थेट भिंतीवर आदळली. त्यानंतर काही वेळातच तिची प्रसूती झाली. डोक्याला मार लागल्याने बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून करुणा चौधरीवर निलंबनाची कारवाई करावी, तसेच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गारे कुटुंबाने सरकारवाडा पोलीस आणि सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्याकडे केलीय. यानिमित्ताने सिव्हिल हॉस्पिटलमधील अनागोंदी कारभार आणि कर्मचाऱ्यांचा उद्दामपणा, मनमानी कारभारदेखील चव्हाट्यावर आलाय.

First Published on: November 11, 2021 6:52 PM
Exit mobile version