कर्जमुक्तीस पात्र शेतकर्‍यांना तातडीने पीककर्ज देण्याचे निर्देश : जिल्हाधिकारी मांढरे

कर्जमुक्तीस पात्र शेतकर्‍यांना तातडीने पीककर्ज देण्याचे निर्देश : जिल्हाधिकारी मांढरे

खरिप हंगामासाठी जिल्हयाला देण्यात आलेल्या पीककर्जाच्या उदिदष्टापैकी अवघ्या ४१ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याने कृषीमंत्र्यांनी नाराजी दर्शवत जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने बँकांची बैठक घेउन आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानूसार आज झालेल्या बैठकीत महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना तातडीने नविन पीककर्ज देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले. तसेच कर्जवाटपाबाबत दिलेले उदिदष्ट पूर्ण करण्याबाबत बँकांनी नियोजन करून त्याबाबतचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

नाशिक जिल्ह्याला खरीप हंगामासाठी ३३०० कोटी रूपये पीक कर्ज वाटपाचे उदिदष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १४०० शेतकरयांना अवघे ४१ कोटी रूपयांचेच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. मात्र खरिप हंगामाकरीता शेतकर्‍यांना कर्ज मिळणे आवश्यक आहे. यापार्श्वभुमीवर अधिकाधिक शेतकर्‍यांना पीककर्ज मिळावे यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार २३७ शेतकर्‍यांना १४४५.९८ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांमुळे लागू झालेली आचारसंहिता व त्यानंतर लॉकडाऊनमुळे कर्जमाफीची रक्कम बँकेत जमा होऊ शकली नाही. एकूणच कामकाज थंडावल्याने पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत. या सर्वांचा परिणाम कर्ज वाटपावर झाला.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांची खाती निरंक न झाल्यास ते बँकेचे थकबाकीदार म्हणून गृहीत धरले जातात. जोपर्यंत त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होत नाही तोपर्यंंत त्यांना नविन पीक कर्ज देण्यात बँकांना अडचणी आहेत. थकित कर्जमाफीचा लाभ देवून त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना खरिप २०२० मध्ये पीक कर्ज घेण्यास पात्र करणे असे अपेक्षित आहे. परंतु करोनाच्या संकटामुळे याद्या प्रसिध्द करता येणे शक्य नाही परंतु शेतकर्‍यांना कर्ज मिळणेही आवश्यक आहे. याकरीता कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीनूसार ज्या लाभार्थ्यांना त्यांच्या कर्जखात्यावर योजनेचा लाभ देण्यात आला नाही अशा लाभार्थ्यांना थकबाकीदार न मानता नविन पीककर्ज देण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले आहेत. त्यानूसार प्रत्येक बँकेने सोमवारपर्यंत अशा प्रकारचे ‘इन प्रिन्सिपल सॅक्शन’ देवून अहवाल सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आठवडाभरात ९० कोटींचे कर्जवाटप
गेल्या आठवडयात (दि.२०) मे पर्यंत ३३०० कोटीं रूपयांपैकी अवघ्या ४१ कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र आठवडाभरात यात सुधारणा झाली असून आतापर्यंत १३१ कोटी रूपयांचे पीककर्ज म्हणजेच आठवडाभरात ९० कोटी रूपयांचे नविन कर्ज वाटप करण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

अहवाल सादर करा
कर्जवाटपाचे उदिदष्ट विचारात घेता ज्या बँकांना सर्वाधिक उदिदष्ट देण्यात आले आहे अशा ‘टॉप टेन’ बँकांना उदिदष्टपूर्तीबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत त्याबाबत आपल्याकडे अहवाल सादर करण्याचेही बँकांना सांगण्यात आले आहे. तसेच दर बुधवारी बँकाच्या विभागीय अधिकार्‍यांची बैठक घेउन कर्जवाटपासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना नविन कर्जवाटपाबाबतचे निर्देशही आजच्या बैठकीत देण्यात आले आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

कृषी क्षेत्राकरीता ४५०० कोटी रूपयांचे कर्जवाटपाचे उदिदष्ट देण्यात आले आहे यात ३३०० कोटी रूपये खरिप हंगामाकरीता व उर्वरित रब्बी हंगामासाठी उदिदष्ट देण्यात आले आहे. तसेच यंदा उद्योग क्षेत्रासाठीही मोठी तरतूद करण्यात आली असून कोविड १९ साठी देण्यात आलेल्या विशेष पॅकेजमुळे उद्योगांना कर्जवाटप करण्यात येणार आहे.
अर्धेन्दु शेखर,
मुख्य प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक

पीककर्ज वाटपाचे नियोजन असे..
बँकेचे नाव उद्दीष्ट
राष्ट्रीयकृत बँका २२४३.७९ कोटी
खासगी बँका ६०५.७४ कोटी
ग्रामीण बँका १६.८४ कोटी
जिल्हा मध्यवर्ती बँक ४३७ कोटी
एकूण ३३०३.७५ कोटी

First Published on: May 27, 2020 3:34 PM
Exit mobile version