स्मार्ट कामाचा प्रस्ताव नव्याने सादर करा.

स्मार्ट कामाचा प्रस्ताव नव्याने सादर करा.

जुने नाशिक भागातील मेनरोड व दहीपूल परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण व गटारी तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरू आहे. याकरीता या परिसरात रस्ता खोदण्यात आला आहे. मात्र या कामामुळे रस्ता तीन ते पाच फुट खोल खडडयात जाणार असल्याने यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. तसेच स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते प्रस्तावित करताना महानगरपालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला नाही त्यामुळे या कामासाठी होणारा खर्च वाया जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. याची दखल घेत आमदार देवयानी फरांदे यांनी या भागाची पाहणी केली. स्मार्ट सिटी च्या नावाखाली नाशिककरांची गैरसोय होऊ देणार नसल्याची भावना आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त करत सर्वसामावेशक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सध्या मेनरोड व दहीपूल परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण व गटारी, तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आलेले आहे. काम सुरू करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना विचारात न घेता काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या कामाबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेत आमदार फरांदे यांनी महानगरपालिकेचे अधिकारी व स्मार्ट सिटी योजनेचे अधिकारी यांच्यासमवेत रस्त्याची पाहणी केली. यावेळी दहीपूल परिसरात रस्त्याचे काम हे आत्ता असणार्‍या रस्त्याच्या उंची पासून एक मीटर खाली होणार आहे यासाठी नव्याने गटार योजना देखील करण्यात आलेली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत होणार्‍या कामांमुळे स्थानिक नागरिकांचे व व्यवसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच आमदार फरांदे यांच्या पुढाकाराने जुने नाशिक भागात चार एफएसआय देऊन परिसराचा एकत्रित विकास करण्यासाठी क्लस्टर विकसित करण्याची मागणी करण्यात आली होती. नाशिक महानगरपालिकेने टेंडर प्रक्रिया करून याबाबत सर्वे करून प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर केलेला आहे. स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते प्रस्तावित करताना पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावाचा विचार करण्यात आलेला नाही. यावेळी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या. नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत सर्व समावेशक प्रस्ताव तयार करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. या संदर्भात 24 जून रोजी संबंधित नागरिकांसमवेत योजनेच्या कार्यालयात बैठक घेण्याचे आदेशही आमदार फरांदे यांनी दिले.

नागरिकांनी मांडल्या तक्रारी

आमदार देवयानी फरांदे यांच्या दौर्‍यादरम्यान अनेक स्थानिक नागरिकांनी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत असंतोष व्यक्त करताना यामुळे दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट करताना पुराचा धोका देखील वाढणार असल्याचे आमदार देवयानी फरांदे यांच्यासह उपस्थित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

First Published on: June 18, 2021 3:30 PM
Exit mobile version