चोरीच्या पैशांतून घेतला आयफोन, मौजमजेसाठी उधळपट्टी; दोघांना अटक

चोरीच्या पैशांतून घेतला आयफोन, मौजमजेसाठी उधळपट्टी; दोघांना अटक

चैन आणि मौजमजेसाठी घरफोडी करत त्यातील दागिने विकून आलेल्या पैशांतून दोघांनी आयफोन, सॅमसंग मोबाईल विकत घेतला. तसेच, मौजमजेसाठी पैशांची उधळपट्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यातील एका चोरट्याने चोरीचे दागिने आपल्याला सापडल्याचे सांगत स्वतःच्याआईची दिशाभूल केली. दरम्यान, या घटनेतील दोघा सराईत गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दागिने व दोन मोबाईल जप्त केले आहेत.

संशयित किरण राजू साताळे (दोघेही रा.मल्हारखान झोपडपट्टीजवळ, गंगापूर रोड, नाशिक) व सूरज राजू आहिरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.२३) नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनीट एकचे पोलीस अंमलदार प्रवीण वाघमारे यांना घरफोडी करणारा संशयित आरोपी मल्हारखान झोपडपट्टीजवळ, गंगापूर रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. पोलिसांनी दोघांना घरफोडीबाबत विचारणा केली. सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. सूरज आहिरेने चोरीचे दागिने व रोख रक्कम सापडल्याचे आईला खोटे सांगून घरात ठेवल्याचे दिल्याचे सांगितले. सोन्याच्या बांगड्या व कानातील वेल असे मोडून त्याचे दुसरे सोन्याचे दागिने बनवून तेसुद्धा घरातच ठेवल्याचे सांगितले. तसेच, त्याने चोरीच्या पैशातून एक अ‍ॅपल कंपनीचा आयफोन व एक सॅमसग मोबाईल खरेदी केले असून, उर्वरित रक्कम खाण्या-पिण्यात खर्च केल्याचे त्याने कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन एक लाखाचे सोन्याचे दागिने, चांदीचे जोडवे, अंगठी, मनगटी घड्याळ, दोन मोबाईल जप्त केले. पथकाने दोघांना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोघेही सराईत चोरटे असून, त्यांच्यावर नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीसह गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

First Published on: September 24, 2021 4:08 PM
Exit mobile version