कोरोना रोखण्यासाठी शनिवारपासून जनता कर्फ्यू?

कोरोना रोखण्यासाठी शनिवारपासून जनता कर्फ्यू?

व्यावसायिकांना जनता कर्फ्यूत सहभागाचे आवाहन करताना नागरिक

शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पंचवटीतील जत्रा हॉटेल भागासह विविध ठिकाणी नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन जनता कर्फ्यसाठी आवाहन करत आहेत. कोणार्क नगर भागात २६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करणारा मेसेज सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. मात्र, प्रशासनाकडून याला अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

असा आहे मेसेज

जत्रा परिसरातील नागरिकांना नम्र आवाहन, ‘कोरोना से डरोना’ ही म्हण जरी योग्य असली तरी ‘काळजी करोना’ ही म्हण योग्य आहे. मित्रांनो, जवळचा मित्र वारला. लाखो रुपये बिल भरलं. परिवार उघड़यावर पडला.. अशा असंख्य घटना आजूबाजूला घडत आहेत. याला जबाबदार आपणच ना?.. याचं उत्तर हो असं आहे. जी साखळी कोरोना उभी करतोय तिला तोडायचं कसं, तर फक्त घरात बसून हे शक्य आहे. कोरोना बाजारात आहे हे माहित असूनही होणारी गर्दी बघता त्याचे गांभीर्य दिसत नाही. त्या साखळीला तोडण्यासाठी आपण स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू केला तर नक्कीच आपल्या परिसरातील वाढणारी कोरोनाची साखळी तोड़ता येईल. आपल्या परिसरातदेखील जनता कर्फ्यूकडे सकारात्मक भावनेतून बघावे. याचा विचार करून त्यात सहभागी व्हावे ही विनंती. जनतेने जनतेसाठी जनतेकड़ून राबवलेली बंदी म्हणजे जनता कर्फ्यू. म्हणूनच सगळ्यांनी यात सहभागी होऊन जनता कर्फ्यू यशस्वी करावा ही नम्र विनंती.
– ज्येष्ठ नागरीक कोरोना निवारण समिती (कोणार्क नगर , श्रीराम नगर , वृंदावन नगर, स्वामी समर्थ नगर,जत्रा परिसर, निवृती नगर शरयुपार्क, गणेश काॅलनी (शरयू पार्क) बहिणाबाई परिसर, महालक्ष्मी नगर, रामनाथ नगर, आडगाव शिवार व जत्रा नांदूर रोड परिसरातील सर्व छोटी मोठी नगरे)

First Published on: September 24, 2020 10:22 PM
Exit mobile version