इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी जल्लोषात साजरी

भगवान श्रीकृष्णाचा जयघोष करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नासिकद्वारा श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव जल्लोषात साजरी करण्यात आली. जन्माष्टमीनिमीत्त मंदीर व श्री राधा कृष्णांच्या विग्रहांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. श्रीकृष्णांचे दर्शनासाठी शहरासह लासलगाव, चाळीसगाव, जळगाव, संगमनेर, निफाड, पिंपळगाव, सटाणा, शिरपूर, मुंबई येथून आलेल्या हजारो भाविकांनी गर्दी केली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉन मंदिररात सकाळपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महोत्सवाला सकाळी 5 वाजताच्या मंगल आरतीपासूनच सुरूवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झाले. श्रीकृष्णांच्या विविध लिला प्रदर्शित करणारी लघु नाटये, दिवसभर कीर्तन, भजनाचे विविध कार्यक्रम झाले. जन्माष्टमी निमित्त मंदिरात ३६ तास अखंड हरिनाम संकीर्तन आयोजित करण्यात आले. सुमारे 1 हजार भाविकांनी श्री राधा कृष्णाच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक केला. जन्माष्टमीच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नृत्याली ग्रुपद्वारे कृष्णलीलेवर आधारित नयनरम्य नृत्य सादर केले. रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णंना महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. भगवान श्रीकृष्णांना सायंकाळी सुमारे 1 हजार 8 पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सकाळच्या भागवत प्रवचनाने व्रजविहारी प्रभू यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले.

फुलांच्या पाकळ्यांची सजावट

श्रीकष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवंतांचा आकर्षक श्रृंगार करण्यात आला आहे. निशीगंधा, मोगरा, गुलाब, झेंडू, जरबेरा, कण्हेर, इस्टर, छोटी शेवंता, ऑर्किड यासह अनेक फुलांची रंगसंगतीनुसार सजावट सेवा केली जाते. ही फुले नाशिक व मुंबई येथून आणली जातात. दररोज शहरातील १५ महिला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ३० फुलांच्या पाकळ्यांपासून हार तयार करतात. दिवसाचे हार व शयन दर्शनाचे हार तयार केले जातात. दररोज प्रत्येक फुलांच्या ३० जुड्या आणि सणाच्या दिवशी १ टन फुले आणली जातात.  – राधाभाव माताजी, इस्कॉन मंदिर, नाशिक

First Published on: August 24, 2019 4:58 PM
Exit mobile version