जेटची नाशिक-दिल्ली सेवा ठप्प

जेटची नाशिक-दिल्ली सेवा ठप्प

थकबाकीच्या कारणास्तव इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आय. ओ. सी.) कंपनीने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केल्याने नाशिकसह देशभरातील जेटची विमानसेवा प्रभावित झाली आहे. कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात १२२ पैकी अवघी ७ विमाने उड्डाण घेत आहेत. याचा परिणाम नाशिक-दिल्ली विमानसेवेवरही पडला आहे. गेल्या शुक्रवारी, १२ एप्रिलला दुपारपासून जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केल्याने नाशिकमध्ये दिल्लीसाठी जेट विमानाची वाट पाहणार्‍या प्रवाशांना तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले. मात्र, आता ही सेवा अनिश्चितकाळासाठी जमिनीवर आली आहे.

नाशिकहून विमानसेवेचा अनुभव फारसा चांगला नाही. परंतू गेल्या वर्षी जून महिन्यात सुरू झालेल्या जेटच्या नाशिक-दिल्ली उड्डाणाने नाशिकच्या विमानसेवेला बळ दिले. उडाण याजनेंर्तगत १२ शहरे नाशिकशी हवाईमार्गे जोडली जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद शहरांसाठी एअर अलायन्समार्फत सेवा देत आहेत. पुढील काळात इंडिगो, स्पाईसजेटनेही नाशिकहून सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. नाशिकहून सद्यस्थितीत दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबादसाठी तीन वेगवेगळ्या कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात आहे. यातील अहमदाबाद आणि हैदराबादसाठी दररोज सेवा सुरू असून त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर पुढील काही दिवसांत ‘इंडिगो’ कंपनीतर्फे नाशिक-हिंदण (गाझियाबाद) सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असतानाच नाशिक-दिल्लीसाठी सेवा देणारी जेट एअरवेज ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. वेतन रखडल्याने कर्मचार्‍यांनीही संपाचा इशारा दिला होता. आर्थिक अडचणींमुळे कंपनीला इंधन पुरवठा करणार्‍या इंडियन ऑईलनेही इंधन देण्यास नकार दिल्याने आठ दिवसांपूर्वी अनेक उड्डाणेे रखडली. त्याचा परिणाम नाशिक-दिल्ली विमान पाच ते सहा तास ओझर विमानतळावर उभे होते. यानंतर शुक्रवारी (ता.१२) नाशिक-दिल्ली सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली. परिणामी दिल्लीकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली. दरम्यान, आज जेटने नाशिक-दिल्ली सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या विमानसेवेला घरघर लागली आहे. ही विमानसेवा तत्काळ पूर्ववत व्हावी अशी अपेक्षा उद्योजक, व्यावसायिक व पर्यटकांकडून व्यक्त केली जात आहे.

फटका नाशिकलाही

जेटमार्फत १६५ आसनक्षमता असलेल्या बोईंग ७३७ विमानाद्वारे नाशिक-दिल्ली सेवा दिली जात होती. ही सेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस दिली जात होती. त्यामुळे अवघ्या दोन तासांत नाशिकहून दिल्लीला जाण्याची संधी उपलब्ध झाली. प्रवासी सेवेसोबतच कार्गोसेवाही दिली जात असल्याने शेतमाल निर्यातीलाही चालना मिळाली. मात्र आता जेटच्या आर्थिक समस्येमुळे संपूर्ण देशभरातील जेटची विमाने जमिनीवर आली आहेत, याचा फटका नाशिकलाही बसला.

First Published on: April 14, 2019 11:47 PM
Exit mobile version