कडकनाथ : सांगलीला कोमात, नाशिकला जोमात

कडकनाथ : सांगलीला कोमात, नाशिकला जोमात

लहानमोठ्या चाळीस हजार कडकनाथ कोंबड्यांचे केंद्राला आयएसओ मानांकन, कडकनाथ नावाने विकसित केलेला ब्रॅण्ड, रोज दहा हजार अंड्यांची विक्री, मुंबई, पुण्यातील प्रमुख दुकानांमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाच्या पॅकिंगमध्ये अंडी उपलब्ध, हे सारे उभे राहिले आहे, केवळ चार वर्षांमध्ये. स्वप्नवत वाटणारी ही नाशिकमधील पोल्ट्री उद्योजक संदीप सोनवणे यांची कहाणी आहे. सांगली जिल्ह्यात कडकनाथ कोंबडीच्या नावाने शेतकर्‍यांची फसवणूक झाल्यानंतर कडकनाथ म्हणजे इमूप्रमाणे फ्रॉड असल्याची चर्चा सुरू असताना नाशिकमधील संदीप सोनवणे हे रोज कडकनाथची दहा हजार अंडी विकत असून ते अंड्यावर प्रक्रिया करून रेडी टू इट, कडकनाथ शांपू बाजारात आणून कल्पकतेने व्यवसाय वाढवत आहेत. शेतकर्‍यांनी फसवणार्‍या या भामट्यावर कारवाई करण्यासाठी दबाव जरूर आणावा, मात्र हार न मानता त्यांच्याकडील कडकनाथ कोंबड्यांची अंडी विकण्यासाठी स्वता बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करावा, त्यांना मार्गदर्शन करण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचेही सोनवणे यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

सांगलीत सध्या कडकनाथ कोंबडीची अंडी ६० रुपये नगाप्रमाणे खरेदी करण्याचे आमिष दाखवून एका भामट्याने तेथील शेतकर्‍यांना कोंबड्यांची विक्री केली. प्रत्यक्ष अंडी खरेदीची वेळ आल्यानंतर त्याने हात वर केल्याने हजारो शेतकर्‍यांची फसवणूक झाली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कडकनाथ कोंबडी म्हणजे इमू व ससे पालनाचा पुढील अवतार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत कडकनाथ नावाने स्वताचा ब्रॅण्ड विकसित करणारे नाशिकचे पोल्ट्री उद्योजक संदीप सोनवणे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सोनवणे यांनी कडकनाथ म्हणजे इमूप्रमाणे मृगजळ नाही, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, कडकनाथ ही मध्यप्रदेशातील जंगली कोंबडी असून ती चीन व मलेशियामध्ये वेगवेगळ्या नावाने लोकप्रिय असून जगभरात या कोंबडीला मागणी आहे. यामुळे कडकनाथ कोंबडी हा कुठलाही फ्रॉड नसून केवळ कुणीतरी आपल्याकडून ६० रुपये दराने अंडी घेणार आहे, या भाबड्या आशेपोटी शेतकरी फसल्याने सध्या कडकनाथची बदनामी सुरू आहे. मात्र, शेतकर्‍यांनी अजूनही स्वता मार्केटचा शोध घेतला, तर कडकनाथचे पालन फायद्यात राहू शकते, असे त्यांनी अनुभवातून सांगितले.

५०० ते ४० हजार पक्ष्यांचा प्रवास

संदीप सोनवणे यांनी २०१३च्या सुमारास मध्यप्रदेशात जाऊन कडकनाथ कोंबडीची माहिती घेतली. त्यांच्या माणसांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुुरुवातीला ५०० कोंबड्या आणल्या. मात्र, त्यांच्या अंड्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर त्यातील पौष्टिीक घटकांचे प्रमाण कमी असल्याने मध्यप्रदेशातील संशोधकाची मदत घेतली. त्यांच्या सूचनेनुसार कडकनाथला इतर कोंबड्यांप्रमाणे दिला जाणार आहार बंद करून १९ पोषक घटक असलेले स्वतंत्र खाद्य तयार केले. त्यामुळे सर्वोत्तम पोषक घटक असलेल्या अंड्यांचे उत्पादन सुरू झाले. सुरुवातीला मार्केटिंगसाठी मुंबईवर लक्ष केंद्रित केले. तेथील कलाकार, उद्योजक, खेळाडू यांना या अंड्यांमधील पोषक तत्वांची माहिती दिली. त्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्यक्ष व्यवसायाला सुरुवात केल्यापासून केवळ साडेतीन वर्षांमध्ये कडकनाथची रोज दहा हजार अंडी विकली जात आहेत.

रेडी टू इट आमलेट

कडकनाथ अंडी विकण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅकेजिंग केले जाते. तसेच उन्हाळ्यात अंड्यांची मागणी कमी होत असल्यामुळे उरणार्‍या अंड्यांचे काय करायचे या प्रश्नातून रेडी टू इट आमलेट ही कल्पना सूचली. रेडी टू इट आमलेटमध्ये अंड्यांचे आयुष्य सहा महिने वाढले आहे. सध्या कडकनाथ शांपू बाजारात आणला असून पुढच्या काळात कडकनाथ पिझ्झा, कडकनाथ बर्गर हे खाद्यपदार्थ आणणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. सणासुदीला गिफ्ट म्हणूनही कडकनाथ अंडी देता येतील, अशा गिफ्टपॅकला रमजानमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या कडकनाथ अंड्यांवर ट्रेडमार्क उमटवलेला असल्याने त्यात भेसळ होण्याचा प्रश्नच येत नाही.

आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करीत नाही

कुठल्याही व्यवसायिकाने स्वताच्या उत्पादनांना स्वताच माकेॅट शोधणे गरजेचे आहे. सध्याच्या व्यवस्थेत शेतकर्‍यांच्या उत्पादनाला दुसरा कुणीतरी दर देतो. त्यामुळे त्यातून फसवणूक होत असते. सांगली जिल्ह्यात कडकनाथ कोंबड्यांचा प्रश्नही यामुळेच निर्माण झाला आहे. कडकनाथ कोंबडी ही पालनासाठी फायदेशीर असून त्यासाठी शेतकर्‍यांनी स्वता अभ्यास करून स्वता मार्केट शोधले पाहिजे. याबाबत कुणाही शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्याची आमची तयारी आहे. पण आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करीत नाहीत.– संदीप सोनवणे, संचालक, कडकनाथ, पोल्ट्री फार्म, नाशिक.

First Published on: September 4, 2019 11:58 PM
Exit mobile version