भुजबळांच्या प्रवेशाची पवार, कांदेंना चिंता

भुजबळांच्या प्रवेशाची पवार, कांदेंना चिंता

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ हे रविवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यामुळे नांदगावमध्ये इच्छुक उमेदवार सुहास कांदे व येवला येथील सेनेचे प्रबळ दावेदार संभाजी पवार यांची चिंता वाढली आहे. भुजबळांच्या प्रवेशाविषयी रोज नव्या बातम्या कानी पडत असल्याने सेनेच्या इच्छुकांमध्ये गोंधळ उडाला असून, कार्यकर्तेही सैरभैर झालेले दिसतात. रविवारी (दि.1) भुजबळांचा प्रवेश लांबणीवर पडल्यामुळे पवार, कांदेंना तुर्त दिलासा मिळाला आहे, मात्र उमेदवारीबाबत भिती कायम आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचा रविवारी सोलापूर येथे समारोप झाला. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार नारायण राणे यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात होते. एव्हाना दस्तुरखुद्द नारायण राणे यांनीच पत्रकार परिषदेत याविषयी घोषणा केली होती. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा प्रवेश लांबणीवर पडल्याचे आता बोलले जात आहे. तसेच भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनी भुजबळांना पक्षात घेण्याची खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे. भाजपने राणेंचा प्रवेश रोखल्यामुळे सेनेनी भुजबळांनाही वेटिंगवर ठेवले आहे. ‘भाजपचे राणे तर सेनेचे भुजबळ’या राजकीय तुल्यबळ नेत्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्यामुळे शिवसेनेचे इच्छुक संभ्रमात पडले आहेत. नांदगावमध्ये सेनेचे प्रबळ दावेदार सुहास कांदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊन युतीच्या जागा वाटपात आपला मार्ग मोकळा करून घेतला. गेल्या दहा वर्षांपासून कादेंनी नांदगाव मतदारसंघात मतांची पेरणी केली.

मनमाड, नांदगाव बाजार समितीत सत्ता मिळवत कार्यकर्त्यांचे पुनर्वसन केले. त्यामुळे आता भुजबळ व कांदे यांच्यातच सरळ लढत रंगणार असे वातावरण निर्माण झाले होते. तसेच भुजबळांचे परस्पर प्रतिस्पर्धी संभाजी पवार यांनी नेस्तनाबूत होणार्‍या सेनेला येवला तालुक्यात जीवंत ठेवले. इतकेच नव्हे तर, भुजबळांच्या विरोधात वातावरणनिर्मिती करून पक्षाला नवसंजीवनी मिळवून दिली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी निवडून येणे भुजबळांना अवघड वाटत असताना त्यांचा शिवसेना प्रवेश स्थानिक शिवसैनिकांना न रुचनारा मानला जातो. हा प्रवेश झाला तरी कांदे हे उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र, संभाजी पवार हे पक्ष प्रमुखांच्या निर्णयावर विसंबून आहेत. त्यामुळे भुजबळांचा सेनेत प्रवेश होणार की नाही? यावर पवार, कांदेंचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

उमेदवारीसाठी पक्षप्रमुखांनी शब्द दिला आहे.

भुजबळांनी शिवसेनेत प्रवेश केला तरी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेली पाच वर्षे पक्षासाठी काम केले; यापुढेदेखील पक्षनिष्ठा जपणार आहोत. उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: शब्द दिला असून, त्यांच्यावर विश्वास आहे.  – संभाजी पवार, इच्छुक उमेदवार, शिवसेना

First Published on: September 1, 2019 11:59 PM
Exit mobile version