कर्जमुक्तीच्या नावाने ७ हजार गुंतवणुकदारांची फसवणूक

कर्जमुक्तीच्या नावाने ७ हजार गुंतवणुकदारांची फसवणूक

कर्जमुक्तीच्या नावाने ७ हजार गुंतवणुकदारांची फसवणूक

गंगापूर रोडवरील ‘कर्मभूमी मार्केटिंग’ या कंपनीने लाखोंचे आमिष दाखवत शहरातील सुमारे ७ हजार गुंतवणूकदारांना ८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मल्टिलेव्हल मार्केटिंगचा फंडा वापरत कर्जमुक्तीच्या नावाने ही योजना ऑगस्ट २०१८ पासून सुरू करण्यात आली होती. सहा महिने उलटूनही परतावा मिळत नसल्याने हादरलेल्या गुंतवणूकदारांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.

काय आहे नेमकं प्रकरण?

होरायझन स्कूलनजीक दत्त चौकातील एका इमारतीत कर्मभूमी मार्केटिंग नावाने सुरू झालेल्या कार्यालयातील शरद उत्तम चव्हाण (मूळ रा. सटाणा), सचिन गुरव (रा. संगमनेर), सॉफ्टवेअर ऑपरेटर संजय उपाध्येय आणि छाया चव्हाण यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार टप्याटप्प्याने १३ हजार रुपयांच्या गुंतवणूकीस भाग पाडले. चव्हाण यांचे सर्व कुटुंबीय या कार्यालयात बसत असल्याने गुंतवणूकदारांचाही योजनेवर विश्वास बसला. योजनेला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनी संचालकांनी परस्पर प्लॅनमध्ये बदल केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. रविवारी गंगापूर पोलिस स्टेशन येथे प्रवीण पवार, स्वप्नील घुमरे, किशोर पाटील, शिवाजी पाटील, रंजना जोशी, भूषण महाजन, अनिल पानसरे, महेश खाडे, दिनेश पाटील, दीपक देवरे, विक्रम पाटील, ललित संचेती, सुनील देशमुख, जयवंत गांगुर्डे, संजय जोशी आदी गुंतवणुकदार तक्रार अर्ज देण्यासाठी एकत्र आले होते.

संशयितांचे मोबाइल बंद, शहरातून फरार

कंपनीचे कार्यालय आणि कंपनी संचालकांचे सातपूर येथील घरदेखील भाडेतत्त्वावरील होते. या दोन्हीही ठिकाणी आता कुणी नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. संबंधितांचे संपर्क क्रमांक महिनाभरापासून बंद असून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. सोमवारी (दि. ७) गुंतवणुकदार पोलिस आयुक्तांची भेट घेऊन साकडे घालणार आहेत.

पोलिसांनी मदत करावी

या योजनेत अत्यंत गरीब व्यक्तींची देखील फसवणूक झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावे. हे प्रकरण पोलिसांत गेल्यामुळे नव्या व्यक्तींची फसवणूक टळू शकेल असे गुंतवणूकदार किशोर पाटील म्हणाले आहेत.

अशी होती योजना

गुंतवणुकदारांना टप्याटप्प्याने १३ हजार रुपये भरण्यास सांगत. याबदल्यात गुंतवणुकदाराला काही प्रॉडक्ट दिले जात. पैशांचा पहिला हप्ता दिल्यानंतर गुंतवणुकदाराला लगेचच एक ग्राहक क्रमांक (आयडी) दिला जात असे. त्या ग्राहकाने आणखी एका ग्राहकाला आणल्यास त्याला एक लाख रुपये मिळणार होते. तसेच सहावी स्टेज पूर्ण केल्यानंतर दीड लाख रुपये दिले जाणार होते.

योजनेची व्याप्ती राज्याबाहेर

शहरासोबतच नाशिक विभाग व राज्यातील अन्य शहरांमध्येही या योजनेची व्याप्ती असल्याचे गुंतवणुकदारांनी सांगितले. नाशिकमधील ७ ते ८ हजार, तर राज्यभरातून एकूण १२ हजार गुंतवणूकदारांची योजनेत फसवणूक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे एकत्रित फसवणुकीचा आकडा हा तब्बल १० कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

First Published on: January 6, 2019 8:09 PM
Exit mobile version