कौतिकराव ठाले-पाटील निर्णयावर ठाम

कौतिकराव ठाले-पाटील निर्णयावर ठाम

शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यापूर्वीच पदाधिकार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असले तरी साहित्य संमेलन मर्यादित खर्चासह चांगले आणि पारदर्शी व्हावे, अशी साहित्य महामंडळाची भूमिका आहे. नाशिकमधील उलट-सुलट चर्चा आणि मागणीमुळे संमेलनात अडचणी येतील. अतिरेकी मागण्या थांबल्या पाहिजेत, असे ठाम मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त कले.

साहित्य संमेलनासाठीच्या निधी संकलनात, अंदाजपत्रकात निमंत्रकांनी मनमानी केल्याप्रकरणी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी समाचार अक्षरयात्रा पुस्तकातून घेतला. त्यानंतर नाशिकमध्ये संमेलन आयोजकांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

निधीसंकलानाची क्षमता पाहून निमंत्रकाने संमेलनाच्या अंदाजपत्रकाबाबतचा अजेंडा बदलला. त्यांच्या संकलन क्षमतेचा पुरेपूर लाभ घ्यायचा, असा लोकहितवादी मंडळाने ठरवले, असा आरोप ठाले-पाटील यांनी अक्षरयात्रा पुस्तकात केला आहे. त्यानंतर संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी आजवर केलेल्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी स्वागत समिती सदस्य श्रीकांत बेणी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यासंदर्भात बेणी यांनी पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. साहित्य संमेलन हे नाशिकचे आहे. लोकहित मंडळ संस्था नाममात्र आहे. नाशिकमध्ये होणारे मराठी साहित्य संमेलन पारदर्शीच होईल, असेही जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.

स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठक झाली. त्यावेळी कौतिकराव ठाले-पाटीलसुद्धा उपस्थित होते. साहित्य संमेलनासाठी शासनाचे ५० लाख रुपये मिळतात. नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत असल्याने आमदार निधीतून प्रत्येकाने १० लाख रुपये निधी द्यावेत, असे भुजबळ यांनी सांगितले असता सर्वांनी प्रतिसाद देत पत्र दिले. शिवाय, संमेलनासाठी प्रायोजक देणगी देण्यासाठी पुढे येत होते.     या सर्व गोष्टी कागदावर होत्या पण प्रत्यक्षात आणल्या नव्हत्या. आरखडे तयार होत असताना कोरोना संकटामुळे सर्व थांबले. संमेलन कसे व कशा पद्धतीने व्हावे, याचा पुर्नविचार केला जाईल. ठाले-पाटीलांशी बोलून गैरसमज दूर केले जातील. साहित्य महामंडळाच्या चौकटीतच राहून संमेलन केले जाईल.
             – हेमंत टकले, कार्याध्यक्ष, साहित्य संमेलन, नाशिक

लोकहितवादी मंडळ नाममात्र असून, संमेलन नाशिककरांचे आहे. साहित्य संमेलन खर्चाच्या सर्व नोंदी ठेवण्यात येत आहेत. संमेलन स्थगित असल्याने टॉल्स शुल्क आणि प्रतिनिधी शुल्क अनेकजण माघारी मागत आहेत. मागणीनुसार सर्वांना शुल्क परत दिले जात आहे. संमेलनाचा हिशोब सर्वांसाठी खुला असून, कार्यालयीन वेळेत कोणालाही हिशोब पाहता येतील. .
– जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख कार्यवाह, साहित्य संमेलन

First Published on: June 28, 2021 6:00 AM
Exit mobile version