देवळ्यातील खुंटेवाडी पहिले ‘डिजिटल ग्राम’

देवळ्यातील खुंटेवाडी पहिले ‘डिजिटल ग्राम’

देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे ’डिजिटल ग्राम’ होण्याच्या बहुमानाचे पत्र खुंटेवाडीच्या सरपंच मीना निकम, उपसरपंच भाऊसाहेब पगार यांच्याकडे देताना डाकअधीक्षक नागेश्वर रेड्डी व बँकेचे क्यू आर कार्ड दाखवताना खातेधारक तसेच इतर डाक अधिकारी.

भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील खुंटेवाडी या गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) चे खातेधारक झाले असून येथे कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झाल्याने देशात सर्वप्रथम आयपीपीबीचे ’डिजिटल ग्राम’ होण्याचा मान खुंटेवाडी या गावाने पटकावला असल्याची माहिती मालेगाव विभागाचे प्रमुख डाकअधीक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली.

खुंटेवाडी येथे झालेल्या माझा अभिमान-सक्षम ग्राम कार्यक्रमात डाक विभागाने याबाबत शिक्कामोर्तब केले असून या माहिती डाक विभागाच्या वतीने शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ’सैनिकांचे गाव’ म्हणून ओळख असणार्‍या खुंटेवाडी गावाने टपाल बँकिंग चा पर्याय स्वीकारत त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या गावात एकही बँक वा पतसंस्था नसल्याने कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी देवळा शहरात जावे लागत असे. परंतु या टपाल बँकेमुळे आता गावात आर्थिक व्यवहार होण्यास सुरुवात झाली आहे. तेही कॅशलेस. या गावातील सर्व ३७८ कुटुंबातील ६७८ व्यक्तींचे व ६ व्यावसायिकांचे आयपीपीबी चे खाते खोलत यातून आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. तसेच सर्व अनुदाने, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्या, सबसिडी या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन असून वीजबिले, विमा अशा सर्व प्रकारचा भरणा येथून करणे शक्य होणार आहे. येथील ग्रामस्थांचा विश्वास व डाक विभागाचे सहकार्य यातून एक महिन्याच्या आत गावाने हे शक्य केले. त्यासाठी येथील उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी सर्वांशी संवाद साधत डिजिटल ग्रामचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी मुंबईच्या पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमास सरपंच मीना निकम अध्यक्षस्थानी होत्या. उपविभागीय डाक निरीक्षक डी.जी.उमाळे, आयपीपीबीचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, क्षेत्रीय प्रबंधक राजीव दुबे यांनी मनोगत व्यक्त करत गावाने मिळवलेल्या या यशाबद्दल प्रमुख पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, कांदा व्यापारी अमोल आहेर यांच्यासह डाक अवेक्षक एस.के.पगार, के.एस.कुवर, मुख्याध्यापक पी.के.सूर्यवंशी, पोलीसपाटील कल्पना भामरे व देवळा सटाणा उपविभागातील डाक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोस्टमास्तर भिला भामरे, गौरव पगार, अनिल भामरे, गणेश भामरे आदी प्रयत्नशील होते. मोठाभाऊ पगार यांनी सूत्रसंचालन केले.

First Published on: July 14, 2019 9:29 PM
Exit mobile version