नाशिक-सूरत महामार्गासाठी जमीन हस्तांतरणास सुरूवात

नाशिक-सूरत महामार्गासाठी जमीन हस्तांतरणास सुरूवात

केंद्राच्या ग्रीन-फिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरुत ग्रीन फिल्ड सहापदरी महामार्गाच्या सादरीकरणाला गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मंजुरी मिळाली आहे. नुकतीच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणची बैठक पार पडली असून महामार्गात येणार्‍या जमिनी हस्तांतरणाला सुरुवात झाल्याने या महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची बैठक उपमहाप्रबंधक एम.एस. कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आर. के. पांडे, महाबीर सिंग, मनोज कुमार, श्रीमान अलोक, एस. एस. सांधू आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महामार्गाचे सादरीकरण करण्यात आले. सुरत ते चेन्नई हे १६०० किलोमीटरचे अंतर अवघे १२५० किलोमीटर वर येणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून जाणार असल्याने नाशिक – सुरत दरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येणार आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत महामार्ग सादरीकरणासह सहापदरीकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी जमिनी हस्तांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
सहा तालुक्यांतून जाणार मार्ग

देशातील गुजरात-महाराष्ट्र-कर्नाटक-तमीळनाडू-आंध्र प्रदेश-तेलंगणा या सहा राज्यांतून जाणारा ग्रीनफिल्ड सहापदरी महामार्ग जिल्ह्यातील सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या सहा तालुक्यातील ६९ गावांतील १२२ किलोमीटर अंतर कापणार आहे. त्यासाठीची सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यांतील वन विभागाच्या जमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या महामार्गासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

First Published on: June 24, 2021 6:37 PM
Exit mobile version