एकमेकांच्या झुंजीत बिबट्या ठार

एकमेकांच्या झुंजीत बिबट्या ठार

पळसे व शेवगे दारणा परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला असुन, शेवगे दारणा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक बिबट्या मृत झाला यातील एका बिबट्याने पळसे कारखाना परिसरात वासरू फस्त केले. परिसरात बिबट्यांची दशहत निर्माण झाली असून, नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

शुक्रवारी (१८) सकाळी शेवगे दारणा येथील परिसरातील गजीराम ढोकणे यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यातील जनावरांना बाहेर सोडले व चारा आणण्यासाठी शेतात गेले. चारा घेऊन परत आल्यावर गोठ्यात त्यांना अचानक बिबट्या दिसला. यावेळी घाबरलेल्या ढोकणे यांनी प्रसंगावधान राखत गोठ्याचा दरवाजा बंद करून बिबट्याला कोंडले. त्यानंतर पोलीस पाटील उज्वला कासार, उपसरपंच राजाराम कासार, माणिकराव कासार आदी ग्रामस्थांनी गोठ्यातून बिबट्या पळुन जाऊ नये, म्हणुन चारही बाजुंनी गोठा बंद केला. वनविभागाला माहिती दिल्यावर अधिकारी वनपरिक्षेत्र विवेक भदाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील वाडेकर, वनपरीमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, पोलीस पाटील सुनील गायधनी घटनास्थळी दाखल झाले.

गोठ्याच्या बाजुने जाळी लावण्यात आल्यावर गोठ्यातील बिबट्या असलेल्या ठिकाणी पाहाणी केली असता बिबट्या खाली पडलेल्या अवस्थेत आढळला. परंतु त्याची हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यावर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी आवाज करत व काठीने ढकलण्याचा प्रयत्न केला. परंतु. सुमारे अर्धा तास बिबट्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांनी गोठ्यात प्रवेश करत केला तेव्हा बिबट्याची हालचाल मंदावली होती. यावेळी बिबट्याच्या गळ्याला गंभीर जखम झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत बिबट्या जिवंत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानंतर त्याला पिंजर्‍यापर्यंत स्ट्रेचरवरुन आणले. पिंजर्‍यात ठेवल्यानंतर अधिकार्‍यांनी पाहाणी केली असता बिबट्या मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर अशोक स्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. गंगापूर येथील रोपवाटीकेत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पळसे व शेवगेदारणा परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे. रोजच कुत्रे, वासरू, जनावरे यांच्यावर हल्ले होतआहेत., यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या भागात पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

First Published on: October 18, 2019 9:48 PM
Exit mobile version