शहरापाठोपाठ गावठाणांमध्येही बिबट्याचा मुक्त संचार; गावकऱ्यांमध्ये दहशत

शहरापाठोपाठ गावठाणांमध्येही बिबट्याचा मुक्त संचार; गावकऱ्यांमध्ये दहशत

शहरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या घटनांपाठोपाठ चारही बाजूने असलेल्या गावठाणांमध्येदेखील बिबट्याची दहशत कायम आहे. आडगाव परिसरातही मंगळवारी (१२ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास बिबट्याने चार शेळ्या फस्त केल्याच्या घटनेपाठोपाठ बुधवारीही (१३ फेब्रुवारी) गंगावऱ्हे परिसरात बिबट्याने गायीसह वासराचा बळी घेतल्याचे समजते.

आडगाव परिसरात दहाव्या मैल भागातील राऊत मळ्यात रात्री अडीच वाजेच्या सुमारास बिबट्याने सहा शेळ्यांवर हल्ला केला. त्यातील चार शेळ्या फस्त केल्याची घटना मंगळवारी (दि.१३) सकाळी उघडकीस आली. चंद्रभागाबाई राऊत यांच्या घराबाहेर शेळ्या बांधलेल्या होत्या. त्यातील सहा शेळ्यांवर हा हल्ला झाला. दरम्यान, राऊत मळ्यात अज्ञात श्वापदाच्या पंजाचे ठसे आढळून आले. मात्र हे ठसे लांडगा, कोल्हा किंवा तरसाचे असावेत, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. हा प्राणी नेमका कोणता, यासाठी या ठिकाणी नाइट विजन कॅमेराही लावला आहे.

गंगापूर शिवारात पुन्हा संचार

गंगापूररोड, मुक्त विद्यापीठ परिसरात बिबट्याचा संचार आढळून आल्यानंतर आता याच परिसरातील गंगावऱ्हे येथील धोंगडे वस्तीनजीक बुधवारी (१३ फेब्रुवारी) एका गोठ्यातील गाय आणि वासरावर हल्ला करत बिबट्याने त्यांचा जीव घेतल्याचे समजते.

First Published on: February 14, 2019 9:38 PM
Exit mobile version