सोयाबीनच्या गंजी जळून अडीच लाखांचे नुकसान

सोयाबीनच्या गंजी जळून अडीच लाखांचे नुकसान

लासलगाव : निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या तीन एकरातील शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजी जळून खाक झाल्या असून, जवळपास दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण शंकर तुपे हे रात्री दहा वाजता जेवण करून झोपले असता सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरासमोरुन पाहिले असता शेतातून मोठ्या प्रमाणात धूर निघतांना दिसला तेव्हा शेतात जाऊन बघितले असता शेत गट नं १०५ मध्ये तीन एकर शेतातील सोयाबीनची सोंगणी करून रचून ठेवलेली जळत असलेली दिसली. सदरचे सोयाबीन विकून आताच घेतलेल्या ट्रॅक्टरचे पैसे द्यायचे नियोजन केले होते. मात्र आता संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या घटनेची माहिती सरपंच व पोलीस पाटील यांना देताच कृषी अधिकारी व तलाठी, पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर येवून पाहणी व पंचनामे केले. यावेळी शेतकरी लक्ष्मण तुपे यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्याची विनंती केली आहे. याप्रसंगी नांदगावचे सरपंच सागर वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष संजय मघाडे, पोलीस पाटील समाधान जाधव उपस्थित होते.

First Published on: November 3, 2021 5:42 PM
Exit mobile version