विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर
नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकारमधील द्वंद्वामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हंगामी अध्यक्ष दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा कार्यकाळ अजून वाढण्याची शक्यता बळावल्याने नाशिककरांना याचा आनंदच होत आहे.
आमदार नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. तेव्हापासून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडेच विधानसभेचे कामकाज आहे. १५ मार्च २०२० रोजी त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या एका व्यक्तीची विधासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे गौरवोद्गार राजकीय नेत्यांनी काढले. ग्रामपंचायत सदस्यत्व, सरपंचपद आणि येथून सुरू झालेला त्यांचा सोसायटी पंचायत समिती, जिल्हा परिषद असा राजकीय प्रवास थेट विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. या प्रवासात मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडे बघितले जाते.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जय-पराजय या श्रृंखलेतून राजकीय प्रवास करणारे नरहरी झिरवाळ हे विधासनभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले, याचा नाशिक जिल्हावासियांना अभिमान वाटतो. अपेक्षेपेक्षा अधिक कार्यकाळ त्यांना मिळाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अनुभव त्यांना एकाचवेळी मिळत आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असल्याने त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची नावे चर्चेत होती. परंतु, राज्यपालांनी निवडणूक प्रक्रियेत आक्षेप घेतल्याने ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

कोण आहेत झिरवाळ ?

दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सर्वसामान्य कुटुंबात १९ जून १९५९ साली झिरवाळांचा जन्म झाला. पत्नी चंद्रभागा व दोन मुले हे शेतीकाम करतात. प्राथमिक शिक्षण आजोळी करंजाळी येथे तर माध्यमिक शिक्षण केआरटी हायस्कूल वणी येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण केटीएचएम महाविद्यालयात झाले.
First Published on: December 28, 2021 9:00 AM
Exit mobile version