महावीरांच्या जयघोषात जयंती उत्सव जल्लोषात

महावीरांच्या जयघोषात जयंती उत्सव जल्लोषात

महावीर जयंतीनिमित्त शहरातून निघालेली मिरवणूक

पेशवाई ढोल पथकासोबत सहभागी झालेल्या युवक, युवती.. लक्ष वेधून घेणारा आकर्षक रथ… बॅण्ड पथकाकडून सादर केली जाणारी सुमधुर भक्तिगीते,आणि श्रीशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की चा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात रविवारी भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शहरासह नाशिकरोड, नवीन नाशिक या उपनगरांतदेखील विविध धार्मिक, समाजोपयोगी कार्यक्रम झाले.

विश्वाला अहिंसेचा संदेश देणार्‍या भगवान श्री महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव बुधवारी शहराच्या विविध भागात साजरा करण्यात आला. श्री जैन सेवा संघ आणि जैन सोशल ग्रुपच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. जैन बांधव पांढरे कपडे परिधान करून या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होते. यंदाच्या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा होता. दहिपूल येथील श्री धर्मनाथ देरासर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. जुन्या तांबट लेनमधील श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, भद्रकालीतील श्री दिगंबर जैन मंदिर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, आर. के. स्थानक, रविवार पेठ, अशोक स्तंभ, गंगापूररोडमार्गे ही शोभायात्रा जुन्या गंगापूर नाक्याजवळील चोपडा बँक्वेट हॉल येथे पोहचली. या ठिकाणी यात्रेचा समारोप झाला. मार्गात ठिकठिकाणी या मिरवणुकीचेे स्वागत करण्यात आले. अहिंसा परमोधर्म की जय, जैन धर्म की जय, जोर से बोलो जय महावीरच्या जयघोषणेने अवघे शहर दुमदुमले. भगवान महावीरांच्या जीवनावरील पोवाडा गीतांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

या मिरवणुकीत आचार्य भव्यभूषण सुरिश्वरजी महाराज आदी ठाणा, शिवसुंदर विजयजी महाराज, शंकरलाल गांग, अशोक मोदी, कांतीलाल कोठारी, मोहन चोपडा, जीएसटी आयुक्त सुमेरकुमार काले, विलास शहा, राहू शहा जयचंद पाटणी, सुनील कासलीवाल, ललीत मोदी, जे. सी. भंडारी, मुग्धा शहा, पारस लोहाडे आदींसह जैन बांधव उपस्थित होते. मिरवणुकीच्या समारोपानंतर साध्वी डॉ. पुण्यशीलाजी महाराज, साध्वी किर्तीशिलाजी महाराज यांचे प्रवचन झाले. भगवान महावीरांचा सत्य, अहिंसाचा संदेश संपूर्ण विश्वात न्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळग्रस्त भागासाठी ७०० टँकर

भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधत जैन सोशल ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४०० हून अधिक जैन बांधवांनी रक्तदान केले. याबरोबर दुष्काळी परिस्थिती बघता ७०० टॅकरद्वारे जिल्ह्यातील १० दुष्काळग्रस्त गावांत पाणी तसेच चारा वाटप केले जाणार असल्याचे यावेळी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा मुग्धा शहा यांनी सांगितले.

शोभायात्रेतून सामाजिक संदेश

निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदान करावे यासाठी मारवाडी युवामंचतर्फे यावेळी पत्रक वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच यात्रेत सहभागी गोधन बचाव रथ, महावीरांची ध्यानस्त प्रतिमा असलेल्या रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

जैन हेल्थ केअर चे उद्घाटन

श्री भारतवर्षीय दि.जैन युवा महासभा नाशिक शाखेतर्फे नाशिक येथे जैन हेल्थ केअर चे उद्घाटन प.पु.साध्वी डॉ.पुण्यशीलाजी व प.पु.साध्वी किर्तीशिलाजीअस्थिरोग तज्ञ डॉ.विजय काकतकर, जी.एस.टी.आयुक्त सुमेरकुमारकाले, सचिन शाह, जीवो अध्यक्षा उज्वला लुणावत, डॉ.विशाल कासलीवाल, डॉ.केतन गंगवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या हेल्थकेअर अंतर्गत शारीरिक असहाय्य रूग्णांना लागणारे साहित्य जसे की, व्हील चेअर, वॉकर, पलंग, स्टिक, टॅक्शन, नॅब्युलायझर. वस्तु मोफत वापरता येणार आह.सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अमित ठोळे व सचिव पंकज गोधा यांनी केले.

First Published on: April 17, 2019 6:12 PM
Exit mobile version