रुग्णसंख्या वाढत राहिल्यास बाजारपेठा बंद

रुग्णसंख्या वाढत राहिल्यास बाजारपेठा बंद

नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता आठवडाभरात सुमारे चारपटीने रुग्णसंख्या वाढली आहे. शहरात ‘नो व्हॅक्सिन नो एन्ट्री’चा निर्णय घेण्यात आला. मात्र, या नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत राहिल्यास शहरातील बाजारपेठा बंद कराव्या लागतील, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला. लॉकडाऊनचा कटू निर्णय घेण्यास भाग पाडू नका, कोरोना त्रिसुत्रीचे पालन करण्याबरोबरच ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लस घ्यावी, असे आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कोरोना आढावा बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी वाढत्या रुग्णसंख्येविषयी चिंता व्यक्त केली. यापुढे निर्बंध अधिक कठोर करण्यात येणार आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये, मॉल्स, तसेच खासगी आस्थापनांमध्ये ‘लस नाही तर प्रवेश नाही’ या नियमांची कठोर अंमलबजावणी करावी. नियमांची न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

लग्न सोहळ्यांमधील उपस्थितीबाबत निर्बंध असतांना शेतात, रिसोर्ट, फार्म हाऊसवर विवाह सोहळ्यांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे अशा विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर पोलिसांनी कारवाई करावी, असेही आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, जर लोक नियमांचे पालन करणारच नसतील तर मात्र नाईलाजाने टोकाची भूमिका घ्यावी लागेल.

लॉकडाउन करण्याच्या मताचा मी नाही, यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. अर्थचक्र थांबते. त्यामुळे पूर्ण बंद करणे योग्य होणार नाही, पण जर लोक नियमांचे पालनच करणार नसतील तर मात्र बाजारपेठा, पर्यटनस्थळे बंद करावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. पुढच्या आठवड्यात पुन्हा कोरोनाचा आढावा घेण्यात येईल त्यानंतर गरज पडल्यास टप्प्याटप्प्याने निर्बंध वाढवले जातील असे ते म्हणाले.

असे असतील निर्बंध

First Published on: January 7, 2022 8:30 AM
Exit mobile version