आमदार निर्मला गावित मंगळवारी बांधणार शिवबंधन

आमदार निर्मला गावित मंगळवारी बांधणार शिवबंधन

काँग्रेस आमदार निर्मला गावित यांचा शिवसेना प्रवेशासाठी अखेर मुहर्त निश्चित झाला आहे. मंगळवारी ( 20 ऑगस्ट) सायंकाळी चार वाजता ‘मातोश्री’वर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहे.

गावित यांनी शिवबंधन बांधून घेतल्यास इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. आमदार निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशाची वेळ, तारीख ठरली असून मंगळवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश नक्की झाला असल्याची अधिकृत माहिती आमदार गावित यांनी दिली. चार महिन्यापूर्वी आमदार गावित भाजपमध्ये प्रवेश करणार अशा ‘वावड्या’ उठल्या होत्या. परंतु, आपण पक्षांतर करणार नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या इच्छुकांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेतला. जलसंपदा विभागातील अभियंता पती रमेश गावित यांची बदली करून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रभारी आमदार भाई जगताप यांच्या वतीने करण्यात आला होता.

मुळातच काँग्रेसमध्ये गावित द्विधा मनस्थितीत राहण्यामागे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून घेतलेली आघाडी कारणीभूत आहे. त्याचबरोबर बंधू भरत गावित यांचे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे संकेत पक्षाकडून मिळत नसल्याने तळ्यात-मळ्यात चालले होते. लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभा निवडणुकीसाठी विचार करण्याचा शब्द काँग्रेसतर्फे देण्यात आला होता. आता मात्र नवापूर मतदारसंघातून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या नावाचा काँग्रेसने विचार सुरू केल्याने भरत गावित यांनी हातावर ‘कमळ’ बांधण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

First Published on: August 19, 2019 8:30 PM
Exit mobile version