‘नावात बच्चू असलो तरी आडनावात कडू’

‘नावात बच्चू असलो तरी आडनावात कडू’

कांदा परिषदेत बोलताना आमदार कडू. समवेत व्यासपीठावरील मान्यवर.

कांदा खायला मिळत नाही म्हणून आतापर्यंत कोणीही मेलेले नाही, परंतू शेतकरी मात्र ठार झालाय. जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत कांद्याच्या समावेशाने भाव वाढत नाहीत, असे सांगत आमदार बच्चू कडू यांनी शेतकर्‍याला न्याय न मिळाल्यास दिल्लीतील कृषिमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू. नावात बच्चू असलो तरी आडनावात कडू आहे, लोकसभेचे रणशिंग फुंकले गेलेय, केंद्रात येणारे सरकार कुणाचेही असो सरकारने आम्हाला गृहीत धरू नये, असा सज्जड इशाराही आमदार बच्चू कडू यांनी कांदा परिषदेत दिला.

प्रहार संघटनेच्या वतीने नाशिकरोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात झालेल्या कांदा परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते. व्यासपीठावर राज्यातील विविध भागांतील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार कडू यांनी शेतकरी, अपंग, कष्टकरी आदी घटकांकडे सरकारचे मुळीच लक्ष नाही. मोदी सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू करुन शेतकर्‍यांचा अपमान केला आहे, कारण शेतकर्‍यांचे शेतात लाखो रुपये खर्च होत असतांना केवळ सहा हजाराने शेतकरी कधीच समाधानी होणार नाही. याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहीजे. मोदींनी याच नंदूरबारच्या सभेत कांद्याचा उल्लेख केला होता, दिल्ली व महाराष्ट्रात सरकार असेल तर कांदा उत्पादकांचे प्रश्न सुटणार असे खोटे आश्वासन देऊनही मोंदींनी शेतकर्‍यांची चेष्टाच केली असल्याचे कडू म्हणाले. आता कांद्याच्या भाववाढीचे आश्वासन सरकारने दिले असले तरी त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्हच आहे. म्हणून निवडणूक होऊ द्या, नव्या मंत्रिमंडळातील कृषिमंत्र्यांच्या घरावर आंदोलन आजच निश्चित झाले असल्याचा इशारा कडू यांनी दिला.

यानंतर संघटना पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद कुदळे यांनी उपस्थितांना उद्देशून शेतीत गेल्यावर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही, अशा अवस्थेत काम करतांना देशोधडीला लागलेला शेतकरी वाचविण्यासाठी बच्चूभाउंच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहन केले. अमरावती संपर्कप्रमुख बंडूभाऊ जवंजाळ यांनी राजकीय फायद्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन केले नसून, शेतकर्‍यांच्या लढ्यासाठी असल्याचे सांगितले. अपंग, कष्टकरी, असंघटीतांच्या न्याय हक्कासाठी प्रहारची स्थापना झाली, अपंगांना न्याय मिळवून देण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.

परिषदेचे आयोजक व नाशिक जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी आमदार कडू यांचे स्वागत केले. परिषदेस प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे, परभणीचे संघटक मंगेश देशमुख, सोलापूर जिल्हाप्रमुख दत्ता म्हस्के, परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग गोधने, नांदेड जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख, लातूर जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, धुळे जिल्हाप्रमुख आप्पा बोरसे, जळगाव जिल्हाप्रमुख विजय भोसले, नंदुरबार जिल्हाप्रमुख बिपीन पाटील, औरंगाबाद जिल्हाप्रमुख सुधाकर शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू घोडके, मंगेश देशमुख,बल्लू जवजाळ, आयटी जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर ढोली, प्रकाश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर , संध्या जाधव, हरिभाऊ महाजन, रेवण गांगुर्डे, राम बोरसे, प्रकाश चव्हाण, दिंगबर ढमाले, हरीसिंग ठोके, गणेश शेवाळे, विनोद आहिरे आदी उपस्थित होते.

परिषदेतील मुद्दे

व्यासपीठ कोसळले

कांदा परिषद संपल्यानंतर आमदार कडू यांना भेटण्यासाठी लोकांनी व्यासपीठावर गर्दी केल्याने व्यासपीठाचा एक भाग कोसळला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

First Published on: February 25, 2019 12:06 AM
Exit mobile version