मनसे नवसंजीवनी मिळवू शकेल का?

मनसे नवसंजीवनी मिळवू शकेल का?

पक्षाच्या स्थापनेपासून कमालीचे राजकीय चढ-उतार अनुभवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मरगळ झटकत राज्यातील बदलत्या राजकीय प्रमेयांचा लाभ उठवण्यासाठी सज्जता दर्शवण्यात सकृतदर्शनी यश मिळवले आहे, तथापि, पूर्वाश्रमी सातत्यपूर्ण बदललेल्या भूमिका आणि नेते-कार्यकर्त्यांची झालेली परवड या दोन प्रमुख कारणांमुळे जनाधार गमावण्याच्या मुद्द्यावरील मंथनासह सर्वेसर्वा राज ठाकरे यापुढे ठोस भूमिका घेतात का, यावर गणिते अवलंबून आहेत.

गमावलेला जनाधार व विकलांग पक्षसंघटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे गुरूवारी मुंबईत होत असलेले महाअधिवेशन निर्णायक ठरण्याची शक्यता असून कडवट हिंदुत्वाच्या शिडीवर चढून राज हे भाजपसोबत सलगी करण्यात खरोखर इच्छूक आहेत का, याचा फैसलाही महाअधिवेशनात होण्याबाबत आडाखे मांडण्यात येत आहेत. तद्वतच मनसे नवर्संजीवनी मिळवण्यात यशस्वी ठरेल का, याबाबतही मराठी मुलखात औत्सुक्य निर्माण झाले आहे.

शिवसेनेतील घुसमटीमुळे बाहेर पडून राज यांनी मनसेची मुहूर्तमेढ रोवताना मराठी माणसाचा मुद्दा हाती घेतला होता. मुंबई, पुण्यापाठोपाठ राज यांना सर्वाधिक राजकीय यश मिळाले ते नाशिकमध्ये. अर्ध्याहून अधिक शिवसेना रिती करताना विविध पक्षीय नेत्यांनीही मनसेच्या इंजिनात बिनदिक्कतपणे बसण्याचा तत्कालीन परिस्थितीत निर्णय घेतल्याने नाशिकच्या राजकारणाने अक्षरश: कूस बदलली होती. नाशिककरांनीही राज यांच्या आक्रमक कार्यपध्दतीला साद घालत तीन आमदार व महापालिका सत्तेचे दान पक्षाच्या पदरात टाकले. त्यावेळी नाशिकसाठीच्या ‘ब्लू प्रिंट’ची राज यांच्यासह त्यांच्या शिलेदारांनी भरपूर चर्चा घडवून आणली. तथापि, पाच वर्षांच्या काळात मनसेला अपेक्षित छाप पाडता आली नाही. पक्षांतर्गत गटबाजी व तत्सम कारणांनी अल्पावधीत मिळवलेला जनाधार लयास गेला. राज यांनी अनेकदा दौरे करून काही प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न केले. मात्र, राजकीय कारणांमुळे त्यांचा यशालेख जेमतेम राहिला. स्थानिक नेतृत्वामध्ये श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून सुप्त लढा सुरू झाल्यामुळे नाशिककरांच्या क्षेमाचे तीनतेरा वाजले. या काळात अनेक मनसैनिकांनी पक्षाला रामराम ठोकला. मात्र, त्यांच्या जाण्याचे सोयरेसुतक नसल्याच्या अविर्भावात एकूणच पक्षनेतृत्व राहिले आणि मनसेच्या गडाचा बुरूज ढासळत गेला. गटबाजीच्या कलहात वसंत गीते, अतुल चांडक यांसारख्या राज यांच्या नेतृत्वाची भुरळ पडलेल्या निष्ठावंतांनी पक्ष सोडला. पक्ष संघटना अक्षरश: खिळखिळी झाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकांत मनसे केवळ नावापुरता पक्ष राहिला. आज नाशकात पक्षाची स्थिती विकलांग अवस्थेत आहे.

या परिस्थितीत राज्यात शिवसेनेने राजकीय साठमारीत घालवलेला ‘हिंदुत्वा’चा स्पेस मिळवण्याचा मनसेचा मनसुबा आहे. पक्षात पुन्हा नवी जान आणण्यासाठी राज यांचा पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेण्याच्या मूडमध्ये आहे. उध्दव यांच्या राजकीय भूमिकेमुळे नाराज असलेल्या शिवसैनिकांना यानिमित्त मनसेचा स्विकार करण्यासाठी साद घालण्यात येत आहे. तथापि, राज यांची कडवट शिस्त आणि त्यांच्याभोवताली असणार्‍या विशिष्ट शिलेदारांचा गोतावळा यामुळे द्विधा मन:स्थितीत असलेले शिवसैनिक हे मनसैनिक होण्यास कितपत आतुर असतील, हा प्रश्न आहे. उद्याच्या राजकारणात मनसेला पुन्हा उभे राहायचे तर धोरणांमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागेल. संघटनात्मक पुनर्बांधणी, रचनात्मक कार्यक्रम आणि जमिनीवर पाय ठेवून कार्यरत राहण्याची शैली पक्षाला अंगिकारावी लागेल. सर्वेसर्वा या नात्याने राज यांनाही सबुरीने घ्यावे लागेल. आजही अशोक मुर्तडक, सलीम शेख, डॉ. प्रदीप पवार यांसारखे लोकांमधील चेहरे पक्षात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे सामुहिक नेतृत्व देऊन नव्याने उभारी घेण्याची किमया पक्ष साधू शकतो. तथापि, गत काळातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये, यास्तव राज आणि त्यांच्या मावळ्यांना सतर्क, सावध भूमिका घेण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागेल, ही मात्र काळ्या दगडावरील धवल रेखा समजावी.

First Published on: January 23, 2020 5:36 AM
Exit mobile version