अभिनंदनला सोडवले, मग कुलभूषणला का नाही?

अभिनंदनला सोडवले, मग कुलभूषणला का नाही?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

मोदी सरकार सांगते की, अभिनंदनला सोडवून आणले. मग, गेल्या अडीच वर्षांत ते कुलभूषणला का सोडवू शकले नाही. जवान शहीद होतात आणि त्याचा राजकीय फायदा मोदी घेतात, असे टिकास्त्र राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी, ११ एप्रिलला नाशिकमध्ये सोडले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आलेले होते. सय्यद पिंप्री येथे सकाळी त्यांची सभा झाली. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या वेळी जाहीर सभेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडीत नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी त्याग केला आणि तरीही मोदी म्हणतात की त्यांनी काही केले नाही. खुद्द मोदींनी ५ वर्षांत काय केले, हाच खरा प्रश्न आहे. आज सर्वदूर सामान्य शेतकऱ्यांची अत्यंत बिकट स्थिती आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या प्रश्नाविषयी काहीच आस्था नाही. माझ्या काळात कांद्याला चांगला भाव मिळत होता. शेतीमालाला योग्य दर दिला जात होता. मात्र, मोदी सरकारच्या काळात सर्व उलटे घडते आहे. भाजर सरकार ८० टक्के शेतीमाल खरेदीदारांचा विचार करते आहे, २० टक्के शेतकऱ्यांचा नाही. मोदी सरकार बोलते खूप, काम काही करत नाही. म्हणूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. पुलवामा हल्ला झाला तेव्हा सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. ही कारवाई लष्कराने केली आणि त्याचे सर्व श्रेय घेत मोदी छाती फुगवतात. स्थानिक पातळीवर नाशिकचा विकास पूर्ण ठप्प झाला असल्याचेही ते म्हणाले.

First Published on: April 11, 2019 2:33 PM
Exit mobile version