..अखेर त्या माऊलीला मिळालं घर आणि मुलगाही!

..अखेर त्या माऊलीला मिळालं घर आणि मुलगाही!

हरवलेल्या मातेची भेट झाल्यानंतर मुलाने सपत्निक पदस्पर्श करत आशीर्वाद घेतले. या वेळी पोलीस आयुक्त नांगरे-पाटील व अधिकारी

मुलांनी घराबाहेर काढल्यामुळे दारोदार भटकण्याची वेळ आलेल्या एका वृद्धेची व्हिडीओ क्लीप सोशल मिडियातून राज्यभर व्हायरल झाली. मुलांच्या शोधार्थ वृध्देने सोमवारी १ एप्रिलला नाशिक पोलीस आयुक्तालय गाठले. तिची व्यथा ऐकून फौजदार नव्हे, तर वस्तू व सेवाकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुलालाही पाचारण करण्यात आले. मात्र, मुलाने सांगितलेली व्यथा काही औरच आहे. आपली आई मनोरुग्ण असून ती घरात थांबायला तयारच नसल्याचे व्यथित होऊन सांगितले. अखेर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी वृद्ध आईला घराबाहेर येवू देवू नका, नाही तर आम्ही तुमच्याकडे लक्ष देवू, अशी तंबी देत पोलिसांनी आईला मुलाच्या ताब्यात देत नीट सांभाळ करण्याची सुचना केली.

गोरक्ष चकणे (२५, रा.मानोरी, ता.सिन्नर,जि.नाशिक) हे शनिवारी (ता.३०) कामानिमित्त मुंबईला गेले. त्यांच्या तीन दिवसांच्या प्रवासात कल्याण रेल्वेस्थानकावर एक वयोवृद्ध महिला नेहमी बघायला मिळे. तिसर्‍या दिवशी त्यांनी आपुलकीने महिलेची चौकशी केली. त्यांनी प्रमिला नाना पवार असे नाव असल्याचे सांगितले. त्यांनी चकणे यांच्याकडे आपबिती सांगितली. त्याची चकणे यांनी मोबाईलमध्ये चित्रफित तयार केली. त्यानंतर शहरात सोशल मिडीयावर दोन मुलांनी घराबाहेर काढलेल्या जन्मदात्या आईचा जवळपास पावणेतीन मिनिटांची आपबिती सांगणारी चित्रफित व्हायरल झाली. या चित्रफितीत वृध्देचा एक मुलगा नाशिक शहरात फौजदार तर दुसरा मुलगा अक्कलकुवा (जि.धुळे) येथे कंडक्टर असल्याचे सांगितले. मुलगा शहर पोलीसमध्ये असल्याचे शहर पोलिसांच्या नाचक्कीचा विषय झाल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही व्हिडीओमध्ये दिसणार्‍या वृद्धेच्या सांगण्याप्रमाणे त्या नावाच्या पोलिसाचा शोध घेण्यास अधिकार्‍यांना सांगितले.

वृध्दा म्हणाली, फौजदार झालेला मुलगा जेंव्हा १४ वर्षांचा होता, तेंव्हा पतीचे अपघाती निधन झाले. त्यानंतर मातेने मुलांना कष्ट करून मोठे केले. दोन्ही मुलांना नोकरी मिळाली. उतारवयात जन्मदात्रीच्या सेवेची वेळ आली तेंव्हा दोघांनीही हात वर केले. मोठया भावाला सगळं दिलं, मग आता तू त्याच्याकडेच जा, असं कंडक्टर असणार्‍या आतिष या मुलाने सांगितलं. तर फौजदार मुलानेही आपल्याला घरात ठेवण्यास असमर्थता दर्शविली, असे वृध्देने चित्रफितीमध्ये सांगितले आहे. मोठा मुलगा संतीश याने आई मानसिक रूग्ण असल्याचे प्रमाणपत्र नाशिकरोड येथील एका डॉक्टरकडून तयार करून घेतले आहे आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिले आहे, असेही वृध्देने चित्रफितीत म्हटले आहे.

मुलगा, सून जीवे मारेल

पोलीस आयुक्तालयात आलेली प्रमिला पवार यांच्याशी ‘आपलं महानगर’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, त्या आपल्या दाव्यावर ठाम होत्या. मोठा मुलगा सतीश व सूनबाईवर माझा विश्वास नाही. ते वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने ३ वर्षांपासून दारोदार भटकत आहे. माझी त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाही, ते मला जीवे ठार मारतील, असेही त्यांनी व्यथित होऊन प्रमिला पवार यांनी सांगितले.

मुलगा पोलीस नव्हे, विक्रीकर निरीक्षक

वयोवृद्ध वृध्देच्या म्हणण्याप्रमाणे मोठा मुलगा पोलीसात फौजदार आहे. मात्र, प्रत्यक्षात मोठा मुलगा सतीश नाना पवार हे वस्तू व सेवाकर विभागाचे विक्रीकर निरीक्षक अधिकारी आहेत. सतीश पवार यांनी पोलीस आयुक्तालयात आई मनोरूग्ण असल्याचे व तिच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र व उपचाराची कागदपत्रे घेऊन आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याही बाजू माहिती समजून घेतली.

आईवर उपचार चालू

आई प्रमिला नाना पवार या मनोरूग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील नामांकित वैद्यकीय डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत. त्या दर आठवडल्या घरातून कोणासही काही न सांगता निघून जातात. आईचा बसस्थानक, रेल्वेस्थानक, मुक्तिधाम, पंचवटी भागात शोध घेतला आहे. ज्या दिवशी चित्रफित व्हायरल झाली त्या दिवशी आईने घरी नातवंडांसोबत जेवण केले होते. – सतीश नाना पवार (मोठा मुलगा)

पोलिसांकडून आधार

वयोवृद्ध महिला प्रमिला पवार या पोलीस आधिकार्‍यांना सांगत होत्या की, मला मुलाकडे पाठवू नका, तो व सूनबाई जीवेठार मारेल. त्यावेळी पोलीस अधिकारी अशोक भगत यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी महिलेला भावनिक आधार दिला. तुमच्यासोबत शहरातील ३ हजार ७२ पोलीस आहेत. मुलगा कोणताही त्रास देणार नाही. त्रास दिला तर आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. त्यानंतर प्रमिला पवार मुलासोबत जाण्यासाठी तयार झाल्या. सर्व पोलीस अधिकार्‍यांनी प्रमिला पवार यांना आयुक्तालयाच्या गेटपर्यंत येत मुलाच्या गाडीत बसविले.

First Published on: April 1, 2019 8:57 PM
Exit mobile version