खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक आखाडयात

खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक आखाडयात

दिंडोरी लोकसभा मतदार संघ

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज नेल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अद्याप खासदार चव्हाण यांनी भूमिका जाहीर न केल्याने ऐनवेळी ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी नाशिक मतदारसंघातून ११ तर दिंडोरी मतदारसंघातून इच्छुकांनी ९ उमेदवारी अर्ज नेले, तर नाशिकसाठी दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट करत राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. भारती पवार यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या चव्हाण यांनी कळवण येथे समर्थकांचा मेळावा घेऊन पालकमंत्र्यांवर आरोप केले. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पवारांच्या प्रचार दौर्‍यातही उपस्थिती लावल्याने त्यांची नाराजी दूर झाल्याचे बालेले जात होते. भूमिका मांडताना अपक्ष उमेदवारी करून कोरड्या विहिरीत उडी घेणार नाही, असे जाहीर केल्याने भाजपाला काहीसे हायसे वाटले होते. त्यातच बुधवारी (दि.३) हरिश्चंद्र चव्हाण व त्यांची पत्नी कलावती या दोघांच्या नावे त्यांचे पुत्र समीर यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज नेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरूनच पक्षनेतृत्व त्यांची समजूत काढण्यात अयशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

चव्हाणांची उमेदवारी डॉ. पवार यांच्यासाठी धोक्याची मानली जात आहे. त्यामुळे पक्षाकडून चव्हाणांची समजूत कशी काढली जाते आणि चव्हाण काय भूमिका घेतात हे येणार्‍या काळात समोर येईल. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धनंजय भावसार आणि विनोद शिरसाठ यांनी बुधवारी अर्ज दाखल केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून बुधवारी दुसर्‍या दिवशी ११ इच्छुकांनी तर दिंडोरी मतदारसंघासाठी ९ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले. गेल्या दोन दिवसांत नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून एकूण ६९ इच्छुकांनी अर्ज नेले. त्यात अ‍ॅॅड. कत्थु बागुल (अपक्ष), रवींद्र कराटे (अपक्ष), अशोक जाधव (अपक्ष), बाबासाहेब बर्डे (अपक्ष), रामदास बर्डे (अपक्ष), किशोर डगळे (अपक्ष), दादासाहेब पवार (राष्ट्रीय मराठा क्रांती पक्ष) आदींचा समावेश आहे.

नाशिकसाठी यांनी नेले अर्ज

रमेश भाग्यवंत (अपक्ष), महेश शिरुडे (अपक्ष), रंजना म्हात्रे (अपक्ष), लक्ष्मण वाल्मिकी (आम आदमी पार्टी), योगेश कापसे (बसपा), डॉ. वैभव आहिरे (अपक्ष), शिवाजी वाघ (अपक्ष), शरद शिंदे (अपक्ष), मंगेश ढगे (अपक्ष), डॉ. भाऊसाहेबढगे (अपक्ष).

First Published on: April 4, 2019 6:24 AM
Exit mobile version