वाढीव वीजबिलप्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरणार

वाढीव वीजबिलप्रश्नी प्रसंगी रस्त्यावर उतरणार

रक्षा खडसे

वीजबिलात सवलत देण्याची भाषा करणार्‍या राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता आपला शब्द फिरवला आहे. याविरोधात भाजप नेते पुन्हा आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली. वीज ग्राहकांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र, सरकारने याबाबत योग्य भूमिका न घेतल्यास जनहितासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारादेखील रक्षा खडसे यांनी दिला आहे.

खासदार खडसे म्हणाल्या की, ’जेवढं बिल आलेलं आहे, तेवढं बिल ग्राहकांना भरावंच लागेल’, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य सपशेल चुकीचे आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बिल माफ करू, असे राज्यातील जनतेला आश्वासन दिले होते. राऊत हे एक चांगले नेते आहेत. त्यांनी आपला शब्द फिरवायला नको होता. संपूर्ण वीजबिल माफ करू शकले नसले तरी काही प्रमाणात ग्राहकांना सवलत द्यायला हवी, अशी मागणीही खासदार खडसे यांनी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सातत्याने आंदोलनाची गरज पडते आहे. कारण भाजप हा वैयक्तिक फायद्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी आंदोलन करत आहे, असे खासदार खडसे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्नूषा तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला दिसून येतो आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.

First Published on: November 18, 2020 11:58 PM
Exit mobile version