एसटीच्या ४६ लाखांच्या उत्पन्नावर संततधारेने फेरले पाणी

एसटीच्या ४६ लाखांच्या उत्पन्नावर संततधारेने फेरले पाणी

नाशिक विभागात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने एसटीला धुऊन काढले आहे. नाशिक विभागातील 13 डेपोंच्या सुमारे 4 हजार 240 फेर्‍या रद्द झाल्या. त्यामुळे परिवर्तन, शिवशाही, विठाई आदी गाड्या 1 लाख 62 हजार किलोमीटर धावल्या नाहीत. याचा परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला असून पावसाने एसटीचे 46 लाख 8 हजार 362 रुपयांचे केले आहे. नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात होणार्‍या पावसाने या दोन्ही मार्गावर जाणार्‍या फेर्‍याही एसटीने शुक्रवारी (दि.9) बंद केल्या होत्या.

नाशिक जिल्ह्यात 28 जुलैपासून पाऊस बरसत आहे. अतिवृष्टी तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गावरील पूल पाण्याखाली गेले होते. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने शहरासह ग्रामीण भागातील गाड्यांच्या फेर्‍या रद्द केल्या होत्या. चांदोरी आणि सायखेडा परिसरात गोदावरीच्या पुराचे पाणी शिरल्याने औरंगाबाद मार्गावरील सायखेडा चौफुली बंद झाली होती. त्यामुळे तीन ते चार दिवस एसटीच्या गाड्या बंद होत्या. वलखेड येथे कोलवण नाल्याला पूर आल्याने नाशिक-वणी – सापुतारा मार्ग बंद झाल्याने एसटीच्या फेर्‍या बंद झाल्या होत्या. त्याचबरोबर नाशिक-मुंबई महामार्ग हा मुंढेगाव येथे दारणा नदीच्या पुलाखाली गेला होता. या मार्गावरील बससेवा बंद ठेवण्यात आली होती. पावसामुळे प्रवाशांची संख्याही घटलेली आहे. त्यामुळे अनेकांनी प्रवास करण्याचा बेतही केलेला आहे. म्हणून एसटीला गाड्या रद्द करण्याची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने कहर केलेला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे जाणार्‍या शिवशाही गाड्या कालपासून स्थगित केेलेेल्या आहेत. इगतपुरी आगारातून सुटणार्‍या पुणे, आंबेवाडी, सिन्नर, राजूर, कवनाई, भगूर आदी बस बंद करण्यात आल्या आहेत.

फेर्‍या रद्द झालेले मार्ग

नाशिक-मुंबई, नाशिक-पेठ, मालेगाव-नगर, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-कसारा, नाशिक-गुजरात, नाशिक-येवला, नाशिक शहर, सिन्नर-कसारा, मालेगाव-अहमदाबाद, मालेगाव-उनई, मालेगाव-सुरत, इगतपुरी-पुणे, इगतपुरी-आंबेवाडी, इतगपुरी-सिन्नर, इगतपुरी-राजूर, इगतपुरी-भगूर, इगतपुरी-कवनाई आदींचा समावेश आहे. शुक्रवारी (दि.09) नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. दोन्ही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने सकाळी अकरा वाजेपासून सायंकाळपर्यंत बससेवा बंद ठेवण्यात आली होती. यामध्ये धुळे- नवापूर-शहादा, साक्री -नवापूर-नाशिक, नंदुरबार-अक्कलकुवा-सुरत-धडगाव, शिरपुर-चोपडा-शहादा-सुरत, शिंदखेडा-आमराळे-सुरत-सोनेवाडी, नवापूर-सुरत, धुळे-अक्कलकुवा, दोंडाईचा-शहादा आदी बससेवांचा समावेश आहे.

First Published on: August 9, 2019 11:59 PM
Exit mobile version