‘किटी’च्या पैशांतून अंध-अपंगांना मदत; मुद्रा मराठा महिला मंडळाने जपले समाजबंध

‘किटी’च्या पैशांतून अंध-अपंगांना मदत; मुद्रा मराठा महिला मंडळाने जपले समाजबंध

मुद्रा मराठा महिला मंडळाने अंध महिलांना कपड्यांचे वाटप केले. याप्रसंगी उपस्थित मंडळाच्या पदाधिकारी.

विविध उपक्रमांद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या गंगापूररोडवरील मुद्रा मराठा महिला मंडळाने ‘किटी’साठी संकलित निधीतून अंध महिलांसह गतिमंद विद्यार्थ्यांना मदत करत अनोखा आदर्श ठेवला. मंडळाने विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह धान्य व भांड्यांची मदत केली, तर अंध महिलांना कपड्यांचे वाटप केले.

नेहरू उद्यान परिसरातील सुयोजित रतन मॉल येथे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अंध महिलांना वाण म्हणून कपड्यांचे वाटप करण्यात आले. मुद्रा मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा होळकर, पदाधिकारी प्रतिभा पाटील, कुंदा भालेराव, शिल्पा गायकवाड, विजया बोराडे, मनिषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. अंध महिलांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी समजून घेतानाच मंडळाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन होळकर यांनी दिले. मंडळाच्या वतीने दरवर्षी अंधांचा विवाह लावला जातो, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात, आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी, तसेच व्यवसायासाठी मदत केली जाते, याचप्रकारे अन्य संस्था, संघटनांनीही सामाजिक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

सामाजिक कार्यातच खरा आनंद – होळकर

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येक घटकाने आपापल्या परीने मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. मानसिक अपंग, अंध व्यक्तीदेखील समाजाचा घटक असल्याने, त्यांच्या विकासासाठीही संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे. अशा कार्यातच खरा आनंद दडलेला असतो, असे मत होळकर यांनी व्यक्त केले.

मतीमंद विद्यालयात भांड्यांसह वस्तूंचे वाटप

तवली फाटा येथील जलराम निवासी मतीमंद विद्यालयातील मुलांनाही मंडळातर्फे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्यात विविध प्रकारचे धान्य, भांडी, दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमाला विजया पाटील, शालिनी पाटील, ज्योती उशीर, पूनम पाटील, मनीषा पाटील, नीलम पिंगळे, अर्चना मोरे, योगिता आहेर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

First Published on: February 14, 2019 10:26 PM
Exit mobile version