मुंबई-आग्रा महामार्ग खड्ड्यांत

मुंबई-आग्रा महामार्ग खड्ड्यांत

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते कसारा घाट दरम्यान असंख्य खड्डे झाले असून या खड्ड्यांमुळे रोज अपघात होऊन अनेकजन मृत्युमुखी पडत आहे. या मार्गावरील घोटी येथील टोलनाका प्रशासन फक्त टोल वसुलीवर लक्ष केंद्रित करत असून पहिले रस्ता दुरुस्त करा व मगच टोल वसुली करा अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. रस्ता दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करत असेल तर वाहनधारकांनी अजिबात टोल भरू नका असे आवाहन खासदार गोडसे यांनी केले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक-इगतपुरी-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा ते इगतपुरी या रस्त्याचे अवघे दोन महिन्यापूर्वीच काम झाले होते. मात्र केवळ दोनच महिन्यात या रस्त्याची पूर्णत: वाट लागली असून रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडलेले असून वाहने चालवणेही वाहनचालकांना जिकिरीचे झाले आहे. आपण खरचं महाराष्ट्राच्या राजधानीला तथा देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणार्‍या मुंबई शहराच्या दिशेने जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरच प्रवास करतोय ना अशी शंका वाहनधारकांच्या मनात डोकावत आहे.

नाशिक-इगतपुरी-मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा व प्रचंड वर्दळीचा महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्यावर असंख्य वाहने रात्रंदिवस ये-जा करत असतात. जनतेचा रस्त्यावरील प्रवास आधिकाधिक सुखकर व्हावा यासाठी केंद्र व राज्य शासन एकीकडे रस्ते महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाही रस्त्यांची ही दूरावस्था पाहून या निधीला अन्यत्र पाय फुटत तर नाही ना असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

विल्होळी ते कसारा घाट दरम्यान एक ते दीड फुटापर्यंत असंख्य खड्डे पडले आहेत. यात सर्वात जास्त खड्डे विल्होळी, गोंदे, घोटी, बोरटेंभा, पिंप्रीसदो चौफुली, घाटनदेवी परिसरातील महामार्गावर पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साठल्यावर वाहन चालवतांना चालकाच्या लक्षात येत नसून वाहनाचे चाक खड्ड्यात गेल्यावर अपघात होत असून रोज नाहक बळी जात आहे. तसेच वाहनांचेही नुकसान होत असल्याने टोलनाका प्रशासाने त्वरित रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालक करीत आहे.

नाशिक ते कसारा घाट दरम्यान पडलेल्या खड्ड्यांबाबत लवकरच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार असून यावर कायमस्वरूपी उपाय योजना कशी करता येईल याकडे लक्ष वेधणार आहे.

– हेमंत गोडसे, खासदार

युवा सेनेचे गांधीगिरी आंदोलन

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाचे रूपांतर माती अवस्थेत झाले आहे. इगतपुरी मुंबई महामार्गावरील रस्त्याची दुर्दशा अतिशय जीवघेणी झाली आहे. त्यासंदर्भात शुक्रवार (दि. ३०) रोजी युवासेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकारी वर्गाची कानउघाडणी करत स्थानिक पदाधिकार्‍यांनी खड्ड्यात वृक्षारोपण केले.

मुंबई-नाशिक महामार्गाची सध्या अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर युवा सेनेच्या वतीने मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी केली. आता तरी संबंधित विभागाने जागे होत याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. या महामार्गावर पावसाळ्यात नेहमीच मोठे खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गाची ओळख ‘खड्डेयुक्त मार्ग’ अशी झाली आहे. या दूरावस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यावेळी युवासेना इगतपुरी तालुका उप प्रमुख संदिप गव्हाणे, युवासेना इगतपुरी तालुका समन्वयक आकाश खारके, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश खातळे, विद्यार्थी सेनेचे सागर परदेशी, विक्रम गोवर्धने, दिवाजी धोंगडे, गणेश पारधी, योगेश धोंगडे, गोकुळ धोंगडे आदि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

First Published on: July 31, 2021 5:45 AM
Exit mobile version