मविप्र निवडणूक : इगतपुरीत सर्वात कमी मतदार पण डोकेदुखी सर्वाधिक

मविप्र निवडणूक : इगतपुरीत सर्वात कमी मतदार पण डोकेदुखी सर्वाधिक

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सर्वात कमी मतदान इगतपुरी तालुक्यात आहे. मतदान सर्वात कमी असले तरी उमेदवारी कुठल्या पॅनलकडून मिळते आणि वैयक्तिक जनसंपर्क किती आहे, यावरच विजयाचे समीकरण ठरते. त्यामुळे तालुक्यातील मतदारांची भूमिका काहीही असली तरी उमेदवाराला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसब पणाला लागते.

इगतपुरी तालुक्यात एकूण 138 मतदार आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाऊसाहेब खातळे यांना 5 हजार 8 मते मिळाली. त्यांनी वसंत मुसळे यांना पराभूत केले. वसंत मुसळे यांना 4 हजार 292 मते मिळाली होती. सत्ताधारी गटाकडून यंदा भाऊसाहेब खातळे यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी संचालक संदीप गुळवे, कुर्‍हेगाव बेळगाव येथील सुरेश कोंडाजी धोंगडे, संजय गोवर्धने हे इछुक आहेत. संदीप गुळवे यांनी मविप्र समजा शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वत:च्या शिक्षण संस्थेचा राजीनामाही दिल्याचे समजते. तर त्यांचेच नातेवाईक असलेले कुर्‍हेगाव बेळगाव येथील सुरेश कोंडाजी धोंगडे हे देखील प्रबळ दावेदार मानले जातात. इगतपुरी तालुक्याचे रहिवासी असलेले धोंगडे कुटुंबियांचे बहुतांश नातेवाईक निफाड व नाशिक तालुक्यात आहेत.

विशेषत: या नातेवाईकांमध्ये मविप्र सभासदांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या दावेदारीचा विचार केला जाऊ शकतो. सांजेगावचे संजय गोवर्धने यांनाही सत्ताधारी गटाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. इगतपुरी महाविद्यालयास कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने यांचे नावही देण्यात आले आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाच्या विरोधात जाण्याची त्यांची मानसिकता नसेल असे दिसते. सत्ताधारी गटाकडे उमेदवारीची रस्सीखेच सुरु असताना विरोधी गटाकडून अ‍ॅड.दामोदर दगडू पागेरे हे मंगळवारी (दि.9) उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. 2012 मध्ये त्यांनी उमेदवारी केली होती. पण निसटता पराभव झाल्यानंतर त्यांनी 2017 च्या निवडणुकीत संस्थेचा परिपूर्ण अभ्यास केला. सभासदांचे प्रश्न सोडवणे किंवा नवीन सभासदांना कायदेशीर मदत त्यांनी केली. अ‍ॅड.पागेरे यांच्या उमेदवारीचे वैशिष्टकय म्हणजे त्यांचे सर्व नातेवाईक हे निफाड तालुक्यात आहेत. गोदाकाठ परिसरात हे नातेवाईक राहतात. तर कर्मवीर विठ्ठलराव हांडे यांचे जावई म्हणून अ‍ॅड.दामोदर पागेरे यांची जिल्ह्यात सर्वदूर ओळख आहे. निफाडच नव्हे तर नाशिक, देवळा, इगतपुरी तालुक्यातील नातेवाईकांमध्ये सभासदांचा अधिक संबंध या कुटुंबाशी आलेला आहे. या जमेच्या बाजू समोर ठेवून अ‍ॅड.पागेरे हे संस्थेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

First Published on: August 9, 2022 3:38 PM
Exit mobile version