मविप्र : घराणेशाहीचा आरोप करणारेच वडिलांच्या नावाने मत मागतात

मविप्र : घराणेशाहीचा आरोप करणारेच वडिलांच्या नावाने मत मागतात

नाशिक : घराणेशाहीचा आरोप करणारे विरोधक स्वतःच्या वडिलांच्या नावाने मते मागत आहेत. समोरच्या आमदारांची चौथी टर्म असून त्यांनी आतापर्यंत संस्थेला किती निधी दिला हे सांगावे. तसेच, काहींना खासदार व्हायचेय म्हणून मविप्र संस्थेत उमेदवारी करत आहेत. त्यामुळे सभासदांनी पुढच्यास ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे चांगले काम करणार्‍या लोकांना निवडून द्यावे, असे आवाहन आमदार राहुल ढिकले यांनी केले.

धनदाई लॉन्स येथे प्रगती पॅनेलच्या वतीने आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राजाराम धनवटे होते. नीलिमा पवारांनी स्वकर्तृत्व व नेतृत्वाच्या बळावर संस्थेचा नावलौकिक वाढविला. संस्थेबद्दल सभासदांच्या मनात सकारात्मक भावना आहे. त्यामुळे समाजाप्रती परोपकाराची भावना ठेवत संस्थेचे पावित्र्य जपण्यासाठी प्रगती पॅनेलला निवडून द्या, असे आवाहनही अ‍ॅड. ढिकले यांनी केले.

नीलीमा पवार म्हणाल्या की, मविप्र ही लोकशाही मार्गाने काम करणारी संस्था असून गेल्या १२ वर्षात संस्थेला प्रगतीकडे घेऊन जाणारे निर्णय घेतले. संस्थेचे कधीही खासगीकरण होऊ शकत नाही. संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून सभासदांसाठी डॉ. पवार रुग्णालयात एक स्वतंत्र विभाग करण्याचा मानस असून, सभासद पती-पत्नीसोबत आई-वडिलांना मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे.

डॉ. सुनील ढिकले म्हणाले की, डॉ. वसंतराव पवार यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम केली. कोरोनाकाळात शासनानेदेखील मविप्र हॉस्पिटलच्या कामाचे कौतूक केले. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून डॉक्टरांनी व मेडिकल स्टाफने केलेल्या सेवेचा अपमान कुणीही करू नये. सचिन पिंगळे यांनी नाशिक तालुका ताकदीने आपल्यासोबत उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

व्यासपीठावर माणिकराव बोरस्ते, दामोदर गावले, रामचंद्रबापू पाटील, सुरेशबाबा पाटील, पंढरीनाथ पिंगळे, डॉ. तुषार शेवाळे, डॉ. सुनील ढिकले, केदा आहेर, मनोहर बोराडे, त्र्यंबक गायकवाड, अ‍ॅड. निवृत्ती गायकवाड, अ‍ॅड. पंडित पिंगळे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, डॉ. विलास बच्छाव, प्रताप मोगल, शंकर कोल्हे, जगन्नाथ ढिकले, डॉ. जयंत पवार, भाऊसाहेब खातळे, प्रमोद पाटील, माणिक शिंदे, दत्ता गडाख, रघुनाथ फडोळ, मुरलीधर पाटील, संजय फडोळ उपस्थित होते. नानासाहेब महाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भिकाजी शिंदे, लहू मोरे, डॉ. शैलेंद्र गायकवाड, शंकर पिंगळे, मंगेश थेटे, निवृत्ती घुले, धनंजय रहाणे, पद्माकर पाटील, जगन्नाथ ढिकले, दीपक मते, अ‍ॅड. निवृत्ती गायकवाड, रमेश येवले, अभिमन्यू सूर्यवंशी, अ‍ॅड. वसंत पेखळे यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय रहाणे यांनी सूत्रसंचालन केले. माणिकराव बोरस्ते यांनी आभार मानले.

First Published on: August 17, 2022 3:39 PM
Exit mobile version