नंदिनीचे रूपडे पालटणार

नंदिनीचे रूपडे पालटणार

नाशिक : नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत नदीच्या दोन्ही काठावर गॅबियन वॉल बांधून सुशोभिकरण करण्यासाठी २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याचा प्रशासकीय ठराव मंजूर करून तो महापालिकेने स्मार्ट सिटीकडे पाठविला आहे. यामुळे शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या मागणीला यश आले असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नंदिनीच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. गोदावरीचे प्रदूषण रोखण्यालाही यामुळे मदत होणार आहे.

अतिक्रमण, सांडपाणी, घाण, कचरा यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होवून नंदिनी नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ही नदी शेवटी गोदावरी नदीला जावून मिळत असल्याने गोदावरीही प्रदूषित होते. नंदिनीचे पर्यायाने गोदावरीचे प्रदूषण थांबावे, यासाठी दोंदे पूल ते गोविंदनगर म्हणजेच मुंबई नाका सर्व्हिस रोडपर्यंत दोन्ही काठांवर गॅबियन वॉल बांधण्यात यावी, सुशोभिकरण करावे, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने २३ मार्च २०२२ रोजी निवेदनाद्वारे महापालिका व स्मार्ट सिटी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत प्रस्ताव आणि प्रशासकीय ठराव पाठवावा, असे स्मार्ट सिटीने ३१ मार्च रोजी महापालिकेला कळविले होते. शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर दोंदे पूल ते गोविंदनगरपर्यंत खासगी जागा वगळून २० कोटी ३७ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी २७ मे २०२२ च्या प्रशासकीय महासभेवर या प्रस्तावाला मंजुरी दिली. ३१ मे २०२२ रोजी प्राप्त झालेला हा ४ क्रमांकाचा ठराव पुढील कार्यवाहीसाठी स्मार्ट सिटीकडे पाठविण्यात आला आहे. सत्कार्य फाऊंडेशनचे बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे आदींनी आयुक्तांचे आभार मानले.

“नंदिनी नदी ही गोदावरी नदीलाच जावून मिळते, तिचे जतन, संवर्धन होईलच, पर्यायाने गोदावरीचेही प्रदूषण रोखण्यास या प्रकल्पाने मदत होणार आहे. या दोन्ही नद्यांच्या रक्षणासाठी व नाशिककरांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. : रुशीला गायकवाड-देशमुख”

First Published on: June 8, 2022 1:28 PM
Exit mobile version