नाशिक-औरंगाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

नाशिक-औरंगाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

पालकमंत्री छगन भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नाशिक-औरंगाबाद महामार्गाची खड्ड्यांचा महामार्ग बनला आहे. त्यातही कादवा नदीवरील सिंगापूर पॅटर्नचा पूल तर जिवघेणा ठरतो आहे.या पुलाने अनेकांचे बळी घेऊनही रस्ता दुरुस्तीकडे संबंधित विभागाची डोळेझाक सुरू आहे.

या पुलावरून अनेक वाहने थेट नदीपात्रात गेल्याने पुलावरील पाईप तुटले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. ही मलमपट्टी आणखी किती दिवस चालणार, असा संतप्त सवाल वाहनचालकांकडून केला जातो आहे. या दूरवस्थेकडे संबंधित खात्याचे मंत्री, सार्वजनिक बांधकाम खाते वा अन्य कुणाचेच लक्ष नसल्याने चेहेडी गावापासून ते वैजापूर सरहद्द खामगावपर्यंत हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या भागांत अनेक अपघाती बळी गेले असून, अनेकांना अपंगत्व आले आहे. याची दखल घेत निफाडचे अ‍ॅड.समीर भोसले यांनी जनहित दावा दाखल केला आहे. तसेच शिवसेनेचे जेष्ठनेते अनिल पाटील-कुंदे, शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात न्यायालयीन लढाई सुरू केली आहे.

मौजे चेहेडी ते मौजे खामगावदरम्यान एनएच-30 महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्याचा व अनिवार्य हुकूम काढावा, चांदोरी व अचोळा नाल्याची उंची वाढवावी, कादवा नदीवरील पुलाचे कठडे बांधावेत, दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवावेत, नियमबाह्य गतिरोधक काढावेत, महामार्गाच्या दुतर्फा खोदलेले नाले बुजवावेत अशा मागण्या दाव्यातून केलेल्या आहेत.
या दाव्यातील विषय जनतेशी संबंधित असल्याने कुणाचे काही म्हणणे असल्यास त्यांनी स्वतः किंवा वकीलामार्फत २७ ऑक्टोबरपर्यंत हजर राहावे, अशी नोटीस कोर्टाने सही शिक्क्यानिशी प्रसिद्ध केली आहे. जनतेने पुढे यावे, असे आवाहन अ‍ॅड. समीर भोसले, अनिल पाटील कुंदे, विक्रम रंधवे यांनी केले.

औरंगाबाद-नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. त्याच्या दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी आम्ही निफाड न्यायालयात दावा दाखल केला आहे. न्यायालयाने म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे.
                     – विक्रम रंधवे,शिवसेना युवा अध्यक्ष

First Published on: September 27, 2021 7:44 PM
Exit mobile version