नाशिकमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना नागपूरमध्ये अटक

नाशिकमधून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना नागपूरमध्ये अटक

प्रातिनिधिक फोटो

अंबड-लिंक रोडवर 26 जानेवारी रोजी पाणीपुरी विक्रेत्यासह सामाजिक कार्यकर्त्यावर भाईगिरी करीत चाकूने हल्ला करुन फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून नागपूरमध्ये अटक केली. घटनेनंतर तीन आठवड्यांपासून संशयितांच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलीस होते. भाईगिरीमुळे त्रस्त झालेल्या अंबडवासियांनी अंबड-लिंक रोडवर रास्तारोको आंदोलनसुद्धा केले होते. करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने (दोघे रा. अंबड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

26 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित कडुस्कर व भोजने यांनी अंबड लिंक रोडवरील कृष्णानगरमधील बालाजी मोबाईल शॉपीसमोर असलेल्या पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाण्यास आले होते. बिल देण्याच्या वादावरुन दोघांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूहल्ला केला होता. ही घटना बघताच सामाजिक कार्यकर्ते बाजीराव दातीर भांडण सोडविण्यास गेले असता दोघा गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केले. भरवस्तीत गुडांनी धुमाकूळ घालून शिवीगाळ करीत दहशत माजविली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी अंबड-लिंक रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. याप्रकरणी अंबड पोलिसात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांशी संवाद साधला. संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे व कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

तीन आठवड्यापासून संशतिय कडुस्कर व भोजने हे दोघे पसार होते. पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना संशयित दोघे नागपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांचे पथक नागपूरकडे रवाना झाले. पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली. ही कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर व त्यांच्या पथकाने केली.

First Published on: February 20, 2020 5:08 PM
Exit mobile version