मंत्रिमंडळ विस्तारात दत्तक नाशिकला ठेंगाच

मंत्रिमंडळ विस्तारात दत्तक नाशिकला ठेंगाच

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागून असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला रविवारी अखेर मुहूर्त लाभला. राज्यातील विद्यमान सहा मंत्र्यांना घरी बसवत नवीन इनिंगमध्ये ’युती’ने आठ कॅबिनेट मंत्र्यांना तर, पाच राज्यमंत्र्यांना संधी दिली. मंत्रिमंडळाच्या या विस्तारात दत्तक नाशिकच्या एकाही आमदाराचा समावेश झालेला नाही. युतीमध्ये विशेषत: भाजपच्या आमदारांची अपेक्षा फोल ठरल्यामुळे त्यांच्या गोटात नाराजी पसरली आहे.

नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पंधरा आमदारांमध्ये युतीचे पारडे जड भरले आहे. यात भाजपचे नाशिक मध्यमध्ये प्रा देवयानी फरांदे, पश्चिममध्ये सिमा हिरे तर, बाळासाहेब सानप हे पूर्व मतदारसंघाचे वजनदार आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्षाची जबाबदारी सानपांकडे असल्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत सानप व फरांदे यांची नावे सर्वात पुढे होती. चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर हे ग्रामीण भाजपमधील एकमेव आमदार आहेत. त्यांनी डॉ.भारती पवार यांना खासदारकीच्या निवडणूकीत सर्वाधिक मताधिक्य मिळवून देत आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे विस्तारात त्यांनाही कोठेतरी स्थान मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ही अपेक्षा फोल ठरली आहे. अर्थात या आमदारांनी याविषयी उघड प्रतिक्रिया व्यक्त केलेले नाही.

गेल्या चार वर्षात झालेल्या वेगवेगळ्या निवडणूकांमध्ये भाजपच्या मंत्र्यांनी व प्रदेशाध्यक्षांनी दत्तक नाशिकला मंत्रिपद देण्याचे कबूल केले आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर नाशिकमध्ये येवून आश्वासन दिले होते. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तारीत यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा कोठेही विचारच झालेला दिसत नाही, याची खंत कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदांमध्येही जिल्ह्याच्या पदरी हा सन्मान पडला पडलेला नाही. शिवसेनेचे जिल्ह्यात चार आमदार आहेत. यात देवळाली कॅम्पमध्ये माजी मंत्र्यांचे सुपुत्र योगेश घोलप हे समाजकल्याण राज्यमंत्री होऊ शकले असते. तसेच निफाडचे आमदार अनिल कदम हे दोन वेळा निवडून आले आहेत. सिन्नरच्या राजाभाऊ वाजे या सर्व प्रकारापासून अलिप्त राहिले आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे हे एकमेव मंत्रीपद नाशिक जिल्ह्याला लाभले असून, त्यात भर पडण्याची स्वप्न अखेर धुळीस मिळाल्याने दत्तक नाशिककरांची पूरता अपेक्षा भंग झाला आहे.

विखेंना न्याय; खडसे मात्र उपेक्षितच

काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने उत्तर महाराष्ट्राला कुठेतरी न्याय मिळाल्याचे बोलले जाते. मात्र, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मात्र या विस्तारापासून लांब ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीला अल्प कालावधी राहिल्याने औट घटकेसाठी आपण मंत्रीपद घेऊ इच्छित नव्हतो, असे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: June 16, 2019 11:10 PM
Exit mobile version