रिक्षाचालकाने छेड काढल्याने तरुणीची रस्त्यावर उडी

रिक्षाचालकाने छेड काढल्याने तरुणीची रस्त्यावर उडी

छायाचित्र प्रतीकात्मक

नाशिक शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी आणि गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली असून पोलिसांचा वचक राहिला नसल्याने थेट रिक्षात मुलींची छेडछाड करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली आहे. आज रिक्षाचालकाच्या गुंडगिरीचा असाच प्रत्यय रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीला आला.

इंदिरानगर येथून रिक्षात बसलेल्या तरुणीचा रिक्षा चालू असताना चालकाने विनयभंग केला. ‘तू मुझे अच्छी लगती है, ’असे म्हणत रिक्षाचालकाने छेडछाड करण्यास सुरूवात केल्याचे समजते.

त्यानंतर तरुणीने आरडाओरड करून रिक्षा थांबविण्यास सांगितले मात्र तरीही रिक्षाचालक रिक्षा थांबवित नसल्याचे पाहून तिने भरधाव रिक्षेतून उडी मारली. या प्रकारात सदर तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या आहे. रिक्षाचालका विरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

रिक्षाचालकांतील गुंडांचा करावा बंदोबस्त

दरम्यान या प्रकारानंतर रिक्षाचालकांची गुंडगिरी व मुजोरी समोर आली असून नाशिक शहरातील महिला सुरक्षित नसल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या मुजोर रिक्षाचालकांवर आळ घालावर अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी द्वारका परिसरातून रिक्षेत बसलेल्या एका महिला प्रवाशावर पंचवटी बस डेपोच्या मागच्या परिसरात रिक्षाचालकाने दमदाटी करून बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. मात्र असे प्रकार घडूनही काही गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालक खुलेआम रिक्षा व्यवसाय करत असून प्रवाशांसोबत मुजोरी करत असल्याचे प्रकार रोजच घडताना दिसत आहेत.

First Published on: June 20, 2019 10:21 AM
Exit mobile version