‘स्त्री-पुरूष समानते’साठी धावले नाशिककर

‘स्त्री-पुरूष समानते’साठी धावले नाशिककर

मॅरेथॉनमध्ये नाशिककरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला होता.

स्त्री-पुरूष समानतेचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी, २४ फेब्रुवारी आयोजित करण्यात करण्यात आलेल्या नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककर धावले. सिनेअभिनेता विकी कौशल व अंध धावपटू अमरजितसिंग चावला मॅरेथॉन स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते.

पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष होते. या उपक्रमास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकीकडे सकाळची हुडहुडी भरविणारी थंडी तर दुसरीकडे झुंबा डान्स, भांगडा नृत्य यामुळे स्पर्धेत सहभागी होणार्‍या हजारो स्पर्धकांच्या उत्साहात चांगलीच भर पडली. मॅरेथॉन स्पर्धेच्या सुरूवातीला स्पर्धकांकडून झुंबा डान्सव्दारे वॉर्मअप करून घेण्यात आला. सिनेअभिनेता विकी कौशल यांनी पुरूष व महिलांच्या ४२ कि.मी. अंतराच्या स्पर्धेला झेंडा दाखविला. यानंतर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी २१ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. व ३ कि.मी. स्पर्धेच्या पुरूष व महिला गटास झेंडा दाखवून स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी आपलं महानगरचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, श्रीमंत माने, किरण अग्रवाल, वैशाली बालाजीवाले आदी उपस्थित होते.

एकीकडे मॅरेथॉन स्पर्धा तर दुसरीकडे गोल्फ क्लब मैदानावर झुंबा डान्स, शालेय मुलामुलींचे सांस्कृतिक दर्शन घडविणारे दर्जेदार नृत्याविष्कार, ढोल पथकाचे सादरीकरण, भांगडा नृत्य यामुळे या स्पर्धेदरम्यान आनंदी वातावरण तयार झाले होते.  गोल्फ क्लब मदिानापासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा त्र्यंबकनाका सिग्नल-सीबीएस सिग्नल-अशोकस्तंभ-केटीएचएम कॉलेजसमोरील उड्डाण पुलावरून जुना गंगापूरनाका-जेहान सर्कल-महात्मानगर-एबीबी सर्कल-आयटीआय सिग्नल-पपाया नर्सरी-पिंपळगांव बहुला-हॉटेल संस्कृती शुभम वॉटर पार्क-त्र्यंबकरोडने-एबीबी सिग्नल-हॉटेल सिबंल जुना सीबीटी सिग्नल-भवानी सर्कल-उजव्या बाजूने गोल्फ क्लब असा समारोप झाला.

विजेत्यांना शानदार समारंभात पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. अंध धावपटू अमरजितसिंग चावला, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी विजेत्यांचा सत्कार करून पारितोषिके दिली. मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मॅरेथॉन स्पर्धकांसमवेत शपथ घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अ‍ॅक्सिस बँकेचे ए.बी. शर्मा, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सुधीर भागवत, मुकुल श्रीवास्तव, नानक मुल्ला, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

हे ठरले विजेते

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत केनियाचा फेलिक्स आणि महिलांमध्ये लक्ष्मी हिरालाल हे विजेते ठरले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धकांनी केला भांगडा

अंध धावपटू अमरजितसिंग चावला यांनी व्यासपीठावर स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सुरूवातीस भागडा डान्स केला. त्यास उपस्थित स्पर्धकांनी प्रतिसाद देत ठेका धरला. यावेळी वातावरण चैतन्यमय झाले होते. भागडा डान्सवर गोल्फ क्लब मैदान जमा झालेल्या युवक, युवती, पोलीस ट्रेनिग अ‍ॅकेडमीच्या प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरला.

मॅरेथॉनला सिनेअभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती.

सहभागी स्पर्धकांचा मराठमोळा पेहराव आणि पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व अभिनेत्री विद्या करंजीकर यांचे जल्लोषपूर्ण आवाहनदेखील लक्षवेधी ठरले.

First Published on: February 24, 2019 1:34 PM
Exit mobile version