नाशिक मनपा ‘बजेट’ : २४७७ कोटीचे अंदाजपत्रक; नवीन कामांसाठी ४७० कोटी; वाचा, काय मिळाल नाशिकला

नाशिक मनपा ‘बजेट’ : २४७७ कोटीचे अंदाजपत्रक;  नवीन कामांसाठी ४७० कोटी; वाचा, काय मिळाल नाशिकला

नाशिक : पालिकेचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे २४७७ कोटींचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी (दि.३) स्थायी समितीला सादर झाले. महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून माजी पदाधिकारी व नगरसेवकांनी सूचविलेल्या कामांच्या प्रस्तावांच्या आधारे नवीन विकासकामांसाठी तब्बल ४७० कोटींची घसघशीत तरतूद यात करण्यात आली आहे. मोठ्या घोषणा टाळत आयुक्तांनी या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला. अंदाजपत्रकाचे वैशिष्ठ्य म्हणजे आगामी निवडणुकांच्या माध्यमातून निवडून येणार्‍या नगरसेवकांकरिता स्वेच्छा निधी व प्रभाग विकास निधीपोटी करण्यात आलेली ५२.९१ कोटींची तरतूद प्रशासकीय राजवटीत करण्यात आली आहे.

महापालिका स्थायी समितीच्या अंदाजपत्रकीय सभेत मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे २३७७ कोटींचे सुधारीत तर, २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे २४७७ कोटींचे मूळ अंदाजपत्रक प्रशासक डॉ. पुलकुंडवार यांना सादर केले. २४७५ कोटी ८६ लाख खर्चाच्या या अंदाजपत्रकात अखेरची शिल्लक १.२१ कोटी दर्शविण्यात आली आहे. शासनाकडून पालिकेला भरीव निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलवाहिका, परिवहन, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन इ. नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी तरतूद करताना शहराच्या समतोल विकासाचा प्रयत्न केला गेल्याचा दावा डॉ. पुलकुंडवार यांनी अंदाजपत्रकाद्वारे केला आहे. ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर करून सुलभ, पारदर्शक व गतिमान प्रशासकीय कामकाज करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच स्मार्ट स्कूल, पर्यावरण संवर्धन, नमामि गोदा, वैद्यकीय सेवा, आयटी पार्क विकसित करण्याच्या बाबींवर अंदाजपत्रकाच्या माध्यमातून भर देण्याचा प्रयत्न केल्याचे निवेदन पुलकुंडवार यांनी केले आहे.

बांधकाम विभागाला सर्वाधिक ४०४ कोटी

आयुक्तांच्या या अंदाजपत्रकात बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण, गोदावरी संवर्धन, शिक्षण, उद्यान व पशुवैद्यकीय सेवा विभागासाठी गत आर्थिक वर्षापेक्षा अधिक तरतूद करत या विभागांना बळ देण्यात आले आहे. बांधकाम विभागासाठी सर्वाधिक ४०४ कोटी ४६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन सेवेसाठी ५८ कोटी

पाणीपुरवठ्यासाठी ९२.१९, विद्युत ८३.१०, माहिती तंत्रज्ञान ४.१९, पर्यावरण व गोदावरी संवर्धन २८.६३, शिक्षण १२.५१, उद्यान २६.३२ तर पशुवैद्यकीय सेवा विभागासाठी ३.१८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, परिवहन सेवा, मलनिःस्सारण या विभागांच्या तरतुदीत कपात करण्यात आली आहे. परिवहन सेवेसाठी ५८ कोटी तर, मलनिःस्सारणासाठी गतवर्षीच्या तुलनेत १२ कोटी कमी अर्थात ७० कोटींची तरतूद आहे.

काय म्हटले आहे अंदाजपत्रकात

आयटी क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांकरीता रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासाठी नाशिक शहरामध्ये नाशिक आयटी पार्क प्रस्तावित करण्यात येत आहे. सदर आयटी पार्क राज्य शासनाच्या आयटी धोरणानुसार महापालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रस्तावित करण्यात येत आहे. त्याबाबतचा स्वतंत्र चाचपणी अहवाल तयार करण्याचे प्रस्तावित आहे.

रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास

दादासाहेब फाळके स्मारकाचा रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर विकास करण्याची योजना असून त्यासाठी शासनाच्या पर्यटन विभागाकडून निधी मिळविला जाणार आहे. पेठरोड परिसरात प्रस्तावित आंतरराष्टलीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडीअम करीता तरतूद करण्यात आली आहे. यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळासाठी नव्याने स्वारस्य देकार मागविले जाणार असून अन्य काही ठिकाणी बहुमजली वाहनतळ विकासाची योजना आहे.

पथविक्रेत्यांना २० हजार, ५० हजारांचे कर्ज

केंद्राच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या अंमलबजावणीत नाशिक राज्यात प्रथम तर पथविक्रेत्यांना कर्जवाटपात दुसर्‍या क्रमांकावर आहे. या योजनेअंतगत दहा हजार कर्जाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आता २० हजार व ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सदर लाभार्थ्यांना शासनाच्या इतर योजनांशी संलग्न करण्यात येणार आहे.

ट्रक टर्मिनल

नाशिक शहरामध्ये अवजड वाहनांची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने ट्रक टर्मिनल प्रस्तावित करण्यात येत आहे. या ट्रक टर्मिनल विकास योजनेत प्रस्तावित केलेल्या बाह्य वळण रस्त्याच्या जवळ विकसित करण्यात येतील.

First Published on: March 4, 2023 12:42 PM
Exit mobile version