दिवाळी गिफ्ट्स नको! नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा यंदाही भेटवस्तूंना नकार

दिवाळी गिफ्ट्स नको! नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांचा यंदाही भेटवस्तूंना नकार

नाशिक : दिवाळी म्हटली की महापालिकेत ठेकेदारांची कमालीची लगबग दिसते. दिवाळीची भेटवस्तू देत ठेकेदारांकडून अधिकार्‍यांची दिवाळी ‘गोड’ केली जाते. अधिकार्‍यांचे ‘आर्शिवाद’ सतत आपल्यावर राहावे या उद्देशाने भेटवस्तू देण्याचा फंडा असला तरी त्याला काही अपवाद वगळता नाकारत मात्र कुणीही नाही हे विशेष. दिवाळीच्या काळातील महापालिकेतील ही कुप्रथा मोडून काढण्याचे काम आयुक्त कैलास जाधव यांनी यंदाही केले आहे. त्यांनी आपल्या दालनाबाहेर भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत असा फलक झळकावला आहे. दुसरीकडे अन्य अधिकार्‍यांचा गिफ्ट स्वीकारण्याचा सपाटा सुरुच असल्याचे दिसते.

बड्या अधिकार्‍याची मर्जी सांभाळण्यासाठी खुशमस्करे, ठेकेदार, अधिकार्‍यांमध्ये स्पर्धा असते. दिवाळीच्या काळात ही स्पर्धा उघडपणे दिसून येते. या काळात ठेकेदारांकडून अधिकार्‍यांना भेटवस्तू, मिठाई, ड्रायफ्रूट आदी बाबी दिल्या जातात. ज्यांनी ठेके मिळवले आहेत आणि ज्यांना ठेका मिळण्याची अपेक्षा आहे असे दोनही प्रकारचे ठेकेदार यासाठी अग्रेसर असतात. मात्र, हा प्रघात गेल्या वर्षापासून पालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी मोडीत काढला. त्यांनी आपल्या दालनाबाहेर फलक लावत मला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही भेटवस्तू नको, द्यायचे असेल तर गरजूंच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देत दिवाळी साजरी करा, असे आवाहन केले आहे.

महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तांनी अशा प्रकारचा फलक आपल्या दालनाबाहेर लावल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. दुसरीकडे ज्यांना भेटवस्तू घेण्यात रस आहे अशा अधिकार्‍यांची मात्र आयुक्तांच्या या फलकाने कोंडी केली आहे. आपल्या वरिष्ठांनीच भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिल्याने आता पालिकेतील अन्य अधिकार्‍यांना अशा भेटवस्तू स्वीकारण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. असे असतानाही महापालिकेत भेटवस्तू घेऊन येणारे ठेकेदारांचा मात्र दिवसभर राबता असतो हे विशेष.

First Published on: November 1, 2021 9:14 PM
Exit mobile version