नाशिक वाईन निर्मितीचे जागतिक केंद्र बनावे; कोविड काळात दिलासा देणाऱ्या रवी गोडसेंनी व्यक्त केला आशावाद

नाशिक वाईन निर्मितीचे जागतिक केंद्र बनावे; कोविड काळात दिलासा देणाऱ्या रवी गोडसेंनी व्यक्त केला आशावाद

नाशिक : नाशिकचे हवामान हे उत्कृष्ट द्राक्ष निर्मितीसाठी पोषक असल्याने नाशिक हे वाईन निर्मितीचे जागतिक केंद्र बनावे, यासाठी नागरिक आणि सरकारने सामुदायिक प्रयत्न करावेत. एक श्रीमंत, सुखी व समाधानी शहर अशी नाशिकची जगात ओळख व्हावी, असे मत डॉ. रवी गोडसे यांनी व्यक्त केले. कोविडनंतर हृदयरोग व अन्य व्याधी होणार या चिंतेने अनेक लोक त्रस्त आहेत. या लोकांनी चिंता सोडून द्यावी आणि आनंदाने जगता येईल अशा छंदांचा अंगीकार करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

शुक्रवारी (दि.१९) डॉ. दौलतराव आहेर स्मृती व्याख्यान 19 वे पुष्प गुंफण्यात आले. अमेरिका येथील डॉ. रवी गोडसे यांनी वैद्यक शास्त्रातील विनोद या विषयावर १९ वे पुष्प गुंफले. व्याख्यानमालेचे माजी पदाधिकारी डॉ. वि. म. गोगटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आणि विवेक गोगटे, रमेश देशमुख, विनायक कर्‍हाडे यांच्या कन्या विद्या जोग, माजी पदाधिकारी विश्वास ठाकूर, डॉ. कैलास कमोद यांचा वक्ते डॉ. रवी गोडसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक संचलित
होरायझन अकॅडमी, ओझरमिग या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गणपतीस्तोत्र प्रणम्य शिरसा देवम या गीतावर नृत्याविष्कार सादर केला.

मुख्याध्यापिका निर्मला जाधव वर्गशिक्षक गौरी वाघुले, तेजस्विनी लहामगे, नृत्यशिक्षक वैदेही किशोरकुमार पंडित, प्रदीप गोराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा सत्कार गणेश भोरे, सुनील गायकवाड, अ‍ॅड. हेमंत तुपे, संगीता बाफणा, उषा तांबे आदींनी केला. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. लेखक, अभिनेते, निर्माते असलेले अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे यांनी आयुर्वेद आणि अलोपॅथी यातील फरक समजावून सांगितला. यशस्वी डॉक्टर कायम व्यस्त आणि गंभीर असतात हा भ्रम आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक लहान लहान गोष्टी, चुटकुले आणि त्यांना आलेला अनुभव डॉक्टरांनी सांगितला. ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मजा असते तिथे पथ्य पाळूच नये. मजा करणारा दिवस जर घालवलाच नाही तर असे जगणे काय कामाचे आहे. लहान सहान कामे करण्यात, मित्रांसोबत वेळ घालवणे हीच खरी मजा आहेे. आपल्या पेशंटसोबत वेळ घालवणे ही मजा घेणारे डॉक्टर व्हा, असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले.

डॉक्टरांनी आपले छंद जपले पाहिजेत. पेशंटवर बंधने लादू नयेत. डॉक्टरांनी आपल्या पेशंटसोबत हलके फुलके विनोद करून पेशंटला गंभीर परिस्थितीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. डॉ. गोडसे यांनी आपल्या विनोदी शैलीत वैद्यकीय क्षेत्रातील घडणारे अनेक प्रासंगिक विनोद कथन केले. हसत रहावे. हसण्याने शस्त्रक्रिया टाळता येतील. डॉ. रवी गोडसे यांनी ऊर्दू शेरो-शायरी, चारोळ्या, कविता आणि गाणी यांचा वापर करून श्रोत्यांना गंभीर अशा वैद्यकीय क्षेत्रातील गमतीजमती सांगितल्या. तुम्हाला आजार असतात, पण आजारांसाठी तुम्ही नाहीत. गंभीरपणे जगू नका, विनाकारण बंधन नको, कमीत कमी आणि आवश्यक त्याच टेस्ट करा, कमीत कमी गोळ्या, औषध घ्या, नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि आपले दुःख वाटूच नका की लोक अनेक वर्षे ते चघळत बसतील असा बहुमोल सल्ला त्यांनी दिला. व्याख्यानमालेच्या दुसर्‍या सत्रात अफलातून ग्रुप प्रस्तुत 90 च्या दशकातील अविस्मरणीय गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मयूर टूकडीया, विशाल दाते, रेणुका बायस यांनी अतिशय बहारदार गाणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

First Published on: May 20, 2023 4:57 PM
Exit mobile version