भुजबळांच्या फोननंतर मुख्यमंत्री गतिमान

भुजबळांच्या फोननंतर मुख्यमंत्री गतिमान

नाशिकमधील अंजूर फाटा आणि भिवंडी फाटा येथील रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करून ही समस्या सोडविण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद देत तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन देतानाच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचाही शब्द दिला. यामुळे माजी उपमुख्यमंत्र्यांना गतिमान प्रशासनाचा अनुभव देण्याचा मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

वाहतूक कोंडीचा होतोय त्रास

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील मुलुंड टोल नाका ते कल्याण फाटा या दरम्यानची अनुषंगिक कामे रखडल्यामुळे जेमतेम २५ किलोमीटरचा टप्पा ओलांडण्यासाठी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरून नाशिक ते वडपे फाट्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. मात्र त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी अवघे २५ किलोमीटरचे अंतर पार करण्याकरिता दोन ते तीन तास लागत आहेत. अंजूर फाटा व भिवंडी फाटा येथे दोन्ही जंक्शनवर तासनतास रहदारीचा खोळंबा होतो. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करण्याचा निर्णय झाला.

प्रश्न मार्गी लागणार

अंजूर फाटा (मानकोली) व भिवंडी फाटा (राजनोली) या दोन्ही उड्डाणपुलांचे काम मे २०१३ मध्ये सुरू झालेले आहे. मात्र, दोन्ही ठिकाणच्या उड्डाणपुलांचे अर्धवट झालेले काम सद्यस्थितीत बंद पडलेले आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सत्ताधार्‍यांनी विरोधकांच्या प्रश्नांना फारसे गांभीर्याने घेतल्याचे फारसे ऐकण्यात . मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांनी भुजबळांच्या फोनला प्रतिसाद देत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

First Published on: January 10, 2019 9:22 PM
Exit mobile version