एकाच पदासाठी भाजपचे दोन अर्ज, सेना-राष्ट्रवादीचे मात्र मनोमिलन

एकाच पदासाठी भाजपचे दोन अर्ज, सेना-राष्ट्रवादीचे मात्र मनोमिलन

नाशिकरोड : येथील प्रभाग सभापतीपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत मनोमिलन होत अखेर शिवसेनेकडून नगरसेवक प्रशांत दिवे यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, भाजपच्या वतीने नगरसेविका मीराबाई हांडगे व माजी सभापती सुमन सातभाई यांचे दोन अर्ज दाखल केल्याने अंतर्गत बंडाळी समोर आल्याची चर्चा आहे. समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठी पद्धतीने निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रभाग २२ मधून पोटनिवडणुकीत आघाडीचे तिकीट घेऊन निवडणुन आलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक जगदीश पवार यांनी अनेक दिवसांपासून सभापती पदासाठी फिल्डींग लावली होती, मात्र राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक असल्याने शिवसेनेने सभापतीपदावर आपला दावा केल्याने अखेर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत दिवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे भाजपाच्या दोन नगरसेविकांनी अर्ज दाखल केल्याने अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आल्याचे बोलले जाते. भाजप मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाडांच्या गटातील समजल्या जाणा-या मिराबाई हांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी आमदार बाळासाहेब सानपांच्या गटातून सुमन सातभाई यांनीही सभापती पदासाठी अर्ज भरला. एकाच पक्षाकडून दोन अर्ज दाखल झाल्याने सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

गायकवाड गटाला शह देण्यासाठी बाळासाहेब गटातील नगरसेवकांनी सातभाई यांचा अर्ज दाखल केला आहे, विशेष म्हणजे निवडुन आल्या नंतर प्रथम सभापती होण्याची संधी सुमन सातभाई यांनी मिळालेली असतांना पुन्हा अर्ज दाखल केल्याने भाजप अंतर्गत चुरस वाढते की काय असा प्रश्न आहे.

First Published on: July 15, 2021 11:52 PM
Exit mobile version