महापालिकेच्या इशाऱ्याचा निमाकडून निषेध

महापालिकेच्या इशाऱ्याचा निमाकडून निषेध

स्वाइन फ्लू बाधिताचा योग्य उपचारांअभावी मृत्यू झाल्यास संबंधित खासगी वैद्यकीय व्यावसायिकावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. पालिकेच्या या भूमिकेचा निमा, नाशिकने तीव्र शब्दांत निषेध केला. डॉक्टरांना अशाप्रकारे धमकावणे निंदनीय असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परिपत्रकाद्वारे स्वाइन फ्लूसंदर्भात डॉक्टरांना इशारा दिला होता. याप्रकरणी निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले की, रुग्ण सरकारी अथवा खासगी डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याच्या आजाराचे अचूक निदान होऊन योग्य उपचारानंतर तो बरा व्हावा, असाच प्रत्येक डॉक्टरचा प्रामाणिक हेतू असतो. स्वाईन फ्लुबाबत समाजात भिती आहे. अनेकदा रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे किरकोळ समजून घरीच उपचार घेतात आणि आजार तीव्र झाल्यावर डॉक्टरकडे येतात. तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यावेळा कुठलाही डॉक्टर त्याला बरे वाटावे म्हणुनच उपचार करतात आणि गरज भासल्यास मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. खासगी रुग्णालयांवर मोठा विश्वास असल्याने रुग्णांची संख्या अधिक असते. मात्र, नाशिक महापालिकेने ज्या पध्दतीने डॉक्टरांविरोधी भूमिका घेतली आहे, ती अत्यंत निंदनिय आहे. प्रबोधनासाठी पालिकेला गरज भासत असल्यास त्यांनी वैद्यकीय संघटनांच्या माध्यमातून शिबिरे घ्यावीत. मात्र, डॉक्टरांना धमकी देऊ नये, असेही डॉ. सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

घरगुती उपायांमुळे वेळेचा अपव्यय

बहुतांश रुग्ण खोकला, सर्दी, तापाची लक्षणे सामान्य समजून स्वतःच्या मनाने परस्पर औषधे घेत असतात. यातून आजाराची तीव्रता वाढते आणि अशा वेळी रुग्ण शक्यतो खासगी रुग्णालयात धाव घेतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अशा रुग्णांची संख्या अधिक असते. आधीच वेळेचा मोठा अपव्यय झालेला असल्याने, अशा स्वाइन फ्ल्यू संशयित रुग्णांवर उपचार करणे आव्हानात्मक असते. अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत डॉक्टर रोगनिदान आणि उपचारासाठी कार्यरत असतात. त्यांच्या प्रामाणिक हेतूवर पालिकेने संशय घेणे अत्यंत निंदनीय बाब आहे. – डॉ. जयश्री सूर्यवंशी, अध्यक्षा, निमा

First Published on: April 1, 2019 8:19 PM
Exit mobile version