श्रीनगर येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून नाशिकचे निनाद मांडवगणे शहीद

श्रीनगर येथे हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून नाशिकचे निनाद मांडवगणे शहीद

श्रीनगरमधील हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेला निनाद मांडवगणे.

काश्मिरमधील श्रीनगरनजीक बडगाम भागात बुधवारी, २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात नाशिकमधील स्कॉड्रन लिडर निनाद मांडवगणे (३३) शहीद झाले. लखनौ येथे राहणाऱ्या निनाद यांनी दोनच दिवसांपूर्वी आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा केला होता. त्यासाठी नाशिकमधून त्याचे आई-वडीलही गेलेले होते.

डीजीपीनगर-१ मधील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीतील बंगल्यात मांडवगणे कुटुंबिय राहतात. निनाद यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेतून (एसपीआय) पूर्ण केले. येथील २६ व्या कोर्सचा तो माजी विद्यार्थी होता. त्यानंतर त्यांनी बी. ई.चं (मॅकेनिकल) शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सिडीएस (कम्बाइण्ड डिफेन्स सर्व्हिसेस) मधून यशस्वी झाल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आणि २४ डिसेंबर २००९ रोजी ते भारतीय वायूदलाच्या सेवेत दाखल झाले. २४ डिसेंबर २०१५ रोजी त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती. निनाद यांची पत्नी लखनौ येथे राहते. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचा वाढदिवस कुटुंबाने साजरा केला. त्यासाठी नाशिकमधून निनाद यांची आई-वडील लखनौला गेलेले होते.

निनाद यांच्या पश्चात लखनौ येथील पत्नी विजेता, दोन वर्ष वयाची मुलगी, वडील अनिल, आई, जर्मनीतील धाकटा भाऊ असा परिवार आहे. निनाद यांच्या आई बँक ऑफ इंडियामधून, तर वडील सिंडीकेट बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुवारी, २८ फेब्रुवारीला ते नाशिकला परतणार आहेत. भारताने दहशतवादी तळ उद्भवस्त केल्यानंतर देशभरात आनंदाची लाट असतानाच, निनादच्या अचानक जाण्याने, मांडवगणे कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अत्यंत हुशार मित्र गमावला

निनाद हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. एसपीआयनंतर इंजिनीअरिंग आणि नंतर तो सीडीएसला गेला आणि त्यानंतर थेट हवाई दलात त्याची निवड झाली. हेलिकॉप्टर अपघातात निनाद शहीद झाल्याची बातमी खूप धक्कादायक आहे. आम्ही अत्यंत हुशार मित्र गमावला. – प्रमोद गायकवाड, संस्थापक, सोशल नेटवर्किंग फोरम

First Published on: February 27, 2019 10:14 PM
Exit mobile version