निफाड कडकडीत बंद, सर्व व्यवहार ठप्प

निफाड कडकडीत बंद, सर्व व्यवहार ठप्प

निफाड शहरात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, बाजार समिती, नगरपंचायत, विविध कार्यकारी सोसायट्यांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, प्रहार अशा विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला.

देशभर कृषी विधेयकाच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनात समाजातील सर्व घटक सहभागी आहेत. त्यामुळे किसान संघर्ष समन्वय समिती, दिल्ली यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ मंगळवारच्या भारत बंद आंदोलनाला निफाड शहरात मोठा प्रतिसाद लाभला. मधुकर शेलार, राजेंद्र डोखळे, सुधीर कराड, सुरेश कापसे, तनवीर राजे, संजय कुंदे आदींनी केलेल्या निफाड बंदच्या आवाहनाला सर्वच घटकांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, नाशिक-औरंगाबाद रोडवरील निफाड चौफुलीवर आमदार दिलीप बनकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांना शेतकरीविरोधी कायदा रद्द करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवृत्ती धनवटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र मोगल, माजी चेअरमन दत्तात्रय पाटील-डुकरे, मविप्रचे माजी संचालक विश्वास मोरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील निकाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती कराड, प्रहार पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष सागर निकाळे, निफाडचे माजी सरपंच शिवाजीराजे ढेपले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुंजाजी तासकर, भूषण धनवटे, नितीन खडताळे, विलास वाघ, विलास बोरस्ते आदींसह हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

वकील संघातर्फे निवेदन

निफाड वकील संघाच्या वतीने निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांना भारत बंदला पाठिंबा देत शेतकरी कायद्याविरोधात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अॅड. संजय दरेकर, अॅड. अरविंद बडवर, अॅड. अण्णासाहेब भोसले आदी वकील उपस्थित होते.

First Published on: December 8, 2020 2:38 PM
Exit mobile version