निष्काळजीपणा : निफाडचे अ‍ँटिजेन केंद्र दोन दिवसांत बंद

निष्काळजीपणा : निफाडचे अ‍ँटिजेन केंद्र दोन दिवसांत बंद

संतोष गिरी : निफाड

उगावचे जिल्हा परिषद सदस्य तथा नाशिक जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या प्रयत्नांतून निफाड शहरातील जिल्हा परिषद शाळेत सुरू झालेले कोरोना अँटिजेन केंद्र दोन दिवसांत बंद झाले आहे. कोरोनाचा विळखा कायम असताना आरोग्य यंत्रणेच्या अशा निष्काळजीपणामुळे स्थानिकांमध्ये मात्र प्रचंड रोष आहे.

हे केंद्र दररोज सकाळी 10 वाजेपासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहणार होते. या केंद्रामुळे निफाड शहर व तालुक्यातील संशयित रुग्णांना लाभ होणार आहे. परंतु दोनच दिवसांत येथील नागरिकांच्या तक्रारी व प्रभाग सदस्यांच्या आदेशामुळे हे केंद्र तातडीने बंद करण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. प्रशासनाने याबाबत अधिक योग्य तो निर्णय घेऊन योग्य त्या जागी हे केंद्र का उभारले नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जनतेचे मत आहे आधीच विलंबाने हे केंद्र उभे राहिले. त्यात दोनच दिवसांत केंद्र बंद पडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाने लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी अथवा एखादे मंगल कार्यालय भाड्याने घेऊन तेथे हे केंद्र उभारावे, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. प्रशासन आता याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. निफाड शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. तरीही प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, तालुक्यातील भूमिपुत्र असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, लोकप्रतिनिधी दिलीप बनकर, माजी लोकप्रतिनिधी अनिल कदम, निफाड नगरपंचायत नगरसेवक, तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्य आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. परंतु खुद्द नागरिकच साथ देणार नसतील तर प्रशासनही काय करणार, असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

या भागातील नागरिक आणि प्रभाग सदस्य यांनी चाचण्या करण्यास अडवणूक करुन बंद करण्यास भाग पाडले आहे. ही बाब वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आलेली असुन, त्यावर चर्चा करुन निर्णय झाल्यानंतर चाचण्या पुन्हा चालु करता येतील.

– डॉ. चेतन काळे, निफाड तालुका आरोग्य अधिकारी

निफाड तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्वरित कारवाई करत निफाड शहरासाठी व तालुक्यातील जनतेसाठी सदर अ‍ॅटीजन्ट केंद्र उभे केले असता स्थानिक नागरिकांनी जर या आरोग्याच्या प्रश्नाकडे अशी डोळेझाक केली तर कोरोनाला कसा आळा घालणार ?हे जनतेच्या आरोग्यासाठी केंद्र असताना जनतेने बंद पडणे योग्य नाही तरी योग्य ती कारवाई करत पुढील निर्णय घेतला जाईल.

– बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद अध्यक्ष, नाशिक

निफाड नगरपंचायत तिच्या वतीने जी जी मदत लागेल ती करण्यास निफाड नगरपंचायत आरोग्य विभागाच्या बरोबर आहे तसेच निफाड शहरात नगरपंचायत ची कोठेही सो मालकीची जागा नसल्याने नगरपंचायत जागा उपलब्ध करू शकत नाही तरीही आरोग्य विभागाशी संपर्क साधून काय उपाययोजना केल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करू.

– डॉ. देवचक्के, निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी

तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी अर्थात प्रांताधिकारी, तहसीलदार, व निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी,यांनी या जनभावनेचा व आरोग्याशी निगडित असलेल्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन शासनाच्या अधीन असलेल्या जागा ताब्यात घेऊन उपाय योजना करणे बंधनकारक असताना दर बाबीकडे या वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रसंग घडतात तरी लोकप्रतिनिधी बरोबर प्रशासकीय यंत्रणा यांचा ताळमेळ नसल्याने सदर घटना घडत आहे तरी या आरोग्याच्या प्रश्नासाठी मी दोन पावले कधीही पुढे येण्यासाठी तयार आहे.

– अनिल पाटील-कुंदे, नगरसेवक, निफाड नगरपंचायत

First Published on: September 27, 2020 9:45 PM
Exit mobile version