सेनेच्या फलकबाजीत नितेश राणेंचा हात

सेनेच्या फलकबाजीत नितेश राणेंचा हात

सेनेच्या फलकबाजीत विरोधीपक्षाचा हात

नगरसेविका किरण गामणे यांचे पती बाळासाहेब दराडे हे नितेश राणेंचे मुळचे कार्यकर्ते आहेत. भाजप कार्यालयाजवळ रात्रीच्या अंधारात येऊन ते जर होर्डिंग लावत असतील तर संशयाला जागा निर्माण होते. युतीत बेबनाव निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष अशा नगरसेवकांना हाताशी धरून असले छिचोर उद्योग करीत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केला. भाजप कार्यालयाबाहेर ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ असे होर्डिंग किरण गामणे यांनी लावल्यानंतर संतप्त सावजींनी ‘आपलं महानगर’शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढली गेली. मोदी हे देशाचा चेहरा होते. त्यांच्याकडे बघून भरभरून मतदान झाले. शिवसेनेचेही मतदान त्यामुळे वाढले असे सांगत सावजी म्हणाले, ज्या प्रमाणे मोदी देशाचा चेहरा आहेत, तसेच राज्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाचा उपयोग झाला तर त्याचा फायदा सेनेलाही होणार आहे. शिवाय सरोज पांडे या भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत. त्या संघटनात्मक कामासाठी नाशकात आल्या होत्या.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युतीसाठी जोमाने कामाला लागावे म्हणून त्यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे विधान केले होते. हे केवळ राजकीय विधान होते. नेमके हेच विधान अधिक हायलाईट करून पुढे आले. मुळात या विधानावर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांचा आक्षेप असता तर ते पुढे आले असते. मात्र, कुणीतरी नगरसेविकेचा पती रात्रीतून येतो आणि होर्डिंग लावून निघून जातो हे योग्य नाही. हा विरोधकांच्या षडयंत्राचाच भाग आहे. गामणे यांचे पती दराडे हे कोण आहे, याची माहिती घ्यावी. ते मुळचे नितेश राणेंचे कार्यकर्ते आहेत. युतीत बेबनाव करण्यासाठी विरोधक अशा काही नगरसेवकांना हाताशी धरून असला उद्योग करीत असतील असा आम्हाला संशय आहे, असेही सावजी म्हणाले.

‘राणेंचा कार्यकर्ता हे सिद्ध करून दाखवा’

दरम्यान, सावजी यांना प्रत्युत्तर देताना बाळासाहेब दराडे म्हणाले की, ‘मी नितेश राणेंचा कार्यकर्ता आहे हे लक्ष्मण सावजी यांनी सिद्ध करून दाखवावं; मी अर्धनग्न अवस्थेत शहरातून भाजपचा झेंडा घेऊन फिरेन. कुणाचंही नाव माझ्याबरोबर जोडून सावजी राजकारण करीत आहेत’, असेही ते म्हणाले.

First Published on: July 16, 2019 10:12 PM
Exit mobile version