पालिकेच्या आशीर्वादाने वृक्षतोडीचा ‘उद्योग’

पालिकेच्या आशीर्वादाने वृक्षतोडीचा ‘उद्योग’

पालिकेच्या पथकाची पाठ फिरताच वृक्षतोड करताना संशयित.

सातपूर विभागातील गणेशनगर ते खांदवेनगरदरम्यान रस्त्याकडेला असलेल्या एका जागेवरील तीन झाडे मजुरांनी तोडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी भेट देत वृक्षतोड थांबवली. मात्र, सूत्रधार शोधून फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत मात्र सोमवारी सायंकाळपर्यंत पालिकेची चालढकल सुरू होती.

गंगापूररोड, पाइपलाइनरोड ते कॅनलरोड भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी आहे. मात्र, विकासाच्या नावाने अनेक झाडे सर्रास तोडली जात आहेत. खांदवेनगर भागातही बाभळाची मोठी तीन झाडे काही मजुरांनी तोडून टाकली. आणखी काही झाडे तोडण्याची तयारी सुरू होती. मात्र, या वृक्षतोडीची माहिती मिळाल्याने घटनास्थळी पोहोचलेल्या महापालिकेच्या पथकाने वृक्षतोड करणार्‍यांना रोखले. या पथकाने विचारणा केल्यावर देवरे नावाच्या एका व्यक्तीने वृक्षतोडीसाठी पाठवल्याचे मजुरांनी सांगितले. दरम्यान, जागामालकाला माहिती न देताच परस्पर वृक्षतोडीचे उद्योग सुरू असल्याचेही दिसून आले आहे. गेल्या वर्षी कॅनलरोड लगतची मोठमोठी झाडे काही व्यक्तींनी तोडली होती. त्यात महापालिकेशी संबंधित गंगापूर येथील एका वखार मालकाचाही हात असल्याचे स्पष्ट झाले होते. पालिकेतील काही अधिकार्‍यांचादेखील या वृक्षतोडीमागे हात असल्याचे सांगितले जाते आहे. सातत्याने होणार्‍या वृक्षतोडीमागील सूत्रधारांविरुद्ध पालिकेने कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे.

राजकीय व्यक्तींचा वरदहस्त

याच भागात गेल्यावर्षी रस्त्याकडेची मोठमोठी चार ते पाच झाडे तोडून टाकण्यात आली होती. या वेळी मजुरांनी ज्या व्यक्तीला फोन केला, तो या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचा कुटुंबातील सदस्य होता. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी थेट विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना माहिती देऊनही पालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली अधिकारी कारवाईबाबत कुचराई करतात, तसेच त्यांच्या आशीर्वादानेच या भागात अतिक्रमणे वाढत असल्याच्याही स्थानिकांच्या तक्रारी आहेत.

आग लावण्याचे प्रकार

कॅनलरोडसह विविध ठिकाणच्या मोकळ्या जागांवरील वाळलेल्या गवताला आग लाऊन देण्याच्या घटना गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहेत. ही आग लांबवर पसरत जाते आणि अनेक वृक्षांचे बुंधेही या आगीने जळतात आणि काही दिवसांत संपूर्ण झाड कोलमडते. आजवर अशी अनेक झाडे नष्ट झाली आहेत. मात्र, या एकाही प्रकाराची महापालिकेने दखल घेतलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटविणार्‍यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचाही पालिकेला विसर पडला आहे. त्यामुळेच गवताला आग लावण्याचे उद्योग त्या-त्या ठिकाणच्या रहिवाशांकडून सुरू आहेत.

First Published on: April 9, 2019 9:06 AM
Exit mobile version